Rajendra Gadge : संगमनेर : तालुक्यातील वडगाव पान येथील भोंदू राजेंद्र गडगे (Rajendra Gadge) बाबा याच्याविरोधात गुन्हा दाखल होऊन दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य आरोपी डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे आणि सुरज शिंदे हे अद्यापही पोलिसांना गुंगारा देत असून पसार आहेत. आरोपींनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज संगमनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने (District and Sessions Court) फेटाळला असतानाही पोलीस त्यांना अटक करू शकलेले नाहीत. या संथ कारभारावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे (Ranjana Gavande) यांनी पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
नक्की वाचा : महायुती सरकारच्या फसव्या कर्जमाफीविरोधात पारनेरमध्ये सर्वपक्षीयांची वज्रमूठ
मम्मुका सुदर्शन यांची घेणार भेट
या प्रकरणी त्या लवकरच जिल्हा पोलीस अधीक्षक मम्मुका सुदर्शन यांची भेट घेणार आहेत. या गुन्ह्यातील मुख्य संशयित राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे हे सध्या जामिनावर सुटले असले, तरी या प्रकरणाचा खूप मोठा तपास अद्याप बाकी आहे. फिर्यादी ॲड. रंजना गवांदे यांना घाबरवण्यासाठी, धमकवण्यासाठी आणि परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी एक बनावट व्हिडिओ तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोप गवांदे यांनी केला आहे.ॲड. गवांदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, त्यांच्या प्रतिमेची छेडछाड करून बनवण्यात आलेल्या या खोट्या व्हिडिओमध्ये आरोपी क्रमांक १ ते ४ यांच्यासह आणखी एक जण सहभागी आहे. हा व्हिडिओ राजेंद्र गडगे याचा मुलगा आणि त्याच्याकडे काम करणाऱ्या एका व्यक्तीने तयार केला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ट्रस्टच्या माध्यमातून आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय (Rajendra Gadge)
इतकेच नव्हे तर, १२ एप्रिल रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास आरोपी ज्ञानेश्वरी गडगे, सुरज शिंदे आणि गडगेची पत्नी हे चारचाकी गाडीतून ॲड. गवांदे यांना धमकवण्यासाठी त्यांच्या घरी आले होते. या गाडीजवळ गडगेचा मुलगाही थांबला होता, याचे सबळ पुरावे उपलब्ध असल्याचे गवांदे यांनी स्पष्ट केले आहे.भोंदू राजेंद्र गडगे याने देवस्थानच्या नावाने ‘दत्तधाम सरकार’ नावाचा ट्रस्ट स्थापन केला आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा संशय आहे. गडगे याने सर्वसामान्य लोकांचे शोषण करून प्रचंड मोठी मालमत्ता जमवली असून, या सर्व आर्थिक बाजूंचा सखोल तपास होणे गरजेचे आहे, अशी मागणी गवांदे यांनी केली आहे.आश्रमात व आश्रमाबाहेर मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर औषधांचा साठा केल्याचे पोलीस पंचनाम्यात समोर आले आहे. कोणताही परवाना नसताना हा बनावट औषध साठा व विक्री केली जात होती.
लोकांच्या घरावर रात्रीच्या वेळी ड्रोन फिरवल्याची तक्रार
या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (FDA) तातडीने ‘ड्रग्स अँड कॉस्मॅटिक्स ऍक्ट’ नुसार कारवाई करणे आवश्यक होते, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. याशिवाय, डॉ. मोहन पुरी याचे नाशिक, जळगाव, नाशिक रोड, मुंबई सेंट्रल, आणि सिन्नर (जायगाव) येथील बनावट औषध निर्मिती कारखाने आणि केंद्रांवर तातडीने छापे टाकून कारवाई करण्याची गरज आहे.वडगाव पान परिसरातील नागरिकांमध्ये आणखी एका प्रकारामुळे घबराट पसरली आहे. गडगे याने बेकायदेशीररित्या त्याच्या आश्रमाच्या आसपासच्या वस्तीवर राहणाऱ्या लोकांच्या घरावर रात्रीच्या वेळी ड्रोन फिरवल्याची तक्रार गावकऱ्यांनी १६ एप्रिल २०२६ रोजी प्रांतअधिकारी व पोलिसांकडे लेखी स्वरूपात केली आहे. हा नागरिकांच्या गोपनीयतेचा भंग आणि सामाजिक गुन्हा असल्याने यावरही गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा
ॲड. रंजना गवांदे यांच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की, फरार आरोपी डॉ. मोहन पुरी, ज्ञानेश्वरी गडगे आणि सुरज शिंदे यांना त्वरित अटक करावी. खोटा व्हिडिओ बनवणे, त्याची जाहिरात व प्रसार करणे यामध्ये सहभागी असणारे महेश दिघे, नाशिकचे पत्रकार लचके, गडगेचा मुलगा आणि पत्नी यांना सहआरोपी करावे.फिर्यादीचा पुरवणी जबाब नोंदवून घेऊन, धमकीचे फोन आणि घराबाहेरील सीसीटीव्ही फुटेज पुराव्यासाठी जमा करावेत. खोट्या व्हिडिओप्रकरणी सायबर कायद्याची कलमे लावून कारवाई करावी. ‘दत्तधाम सरकार’ ट्रस्ट आणि गडगेच्या बेनामी मालमत्तेची सखोल चौकशी व्हावी. या संपूर्ण प्रकरणाचा तपास जलदगतीने व्हावा आणि पीडितांना न्याय मिळावा, यासाठी ॲड. रंजना गवांदे या जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन पुढील दिशा ठरवणार आहेत. या धक्कादायक प्रकरणामुळे संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.



