Sadashiv Lokhande : सदाशिव लोखंडेंनी आखले नव्या राजकीय खेळीचे मनसुबे

लोखंडेंची ही राजकीय खेळी नव्या राजकीय समीकरणांना जन्म देणारी ठरण्याची चिन्हे आहेत

0
Sadashiv Lokhande : सदाशिव लोखंडेंनी आखले नव्या राजकीय खेळीचे मनसुबे
Sadashiv Lokhande : सदाशिव लोखंडेंनी आखले नव्या राजकीय खेळीचे मनसुबे

Sadashiv Lokhande | नगर : शिवसेनेच्या (Shivsena) शिंदे गटाचे नेते खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) हे शिर्डी लोकसभा मतदार संघातील खासदार आहेत. शिर्डी मतदार संघात त्यांच्या विरोधात नाराजी वाढू लागली आहे. या नाराजीवर त्यांनी उपाय शोधला आहे. त्यांनी नव्या राजकीय खेळीचे मनसुबे आखण्यास सुरूवात केली आहे. लोखंडेंची ही राजकीय खेळी नव्या राजकीय समीकरणांना जन्म देणारी ठरण्याची चिन्हे आहेत.

हे वाचा : Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांना भाजपकडून ‘जय महाराष्ट्र’?; मिळणार नवी जबाबदारी


सदाशिव लोखंडेंचा चेंबूर ते शिर्डी राजकीय प्रवास
सदाशिव लोखंडे यांचे मूळगाव कर्जत तालुक्यातील मात्र, त्यांचे बालपण चेंबूरमध्ये गेले. त्यांचे वडील चमडे कमावण्याचा व्यवसाय करायचे. शालेय वयातच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेशी संबंध आला. ते चेंबूर शाखेचे प्रमुख झाले. दिवंगत माजी केंद्रीय मंत्री प्रमोद महाजन यांनी त्यांना भाजपमध्ये अनेक पदे दिली. १९९०मध्ये अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघातून त्यांनी भाजपकडून निवडणूक लढविली. या निवडणुकीत विश्वहिंदू परिषदेने मोठी ताकद पणाला लावली होती. मात्र, काँग्रेसच्या विठ्ठलराव भैलुमेंनी त्यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. बाबरी मशिद पडल्यावर संघ परिवार व भाजपची ताकद वाढली. या लाटेत लोखंडे १९९५, १९९९ व २००४ असे सलग तीन वेळा कर्जत-जामखेडचे आमदार झाले. या मतदार संघाचे आरक्षण निघताच त्यांना भाजपने पुन्हा त्या मतदार संघात निवडणूक लढविण्याची संधी दिली नाही. लोखंडे हे मतदार संघात जास्त दिसत नाहीत, अशा तक्रारी त्यावेळी झाल्याचे सांगितले जाते. पुढे त्यांनी भाजपला रामराम ठोकत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. चेंबूर मधून विधानसभा निवडणूक लढवून पाहिली. मात्र, होमग्राऊंडवर त्यांना विजय मिळविता आला नाही.


२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाऊसाहेब वाकचौरे यांनी निवडणूक अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असताना अचानक शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ म्हटले. हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने शिवसेनेला ऐनवेळी उमेदवार नव्हता. जागा वाटपात शिर्डी शिवसेनेच्या वाट्याला आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपने शिवसेनेला सदाशिव लोखंडेंचे नाव सूचविले. अखेर तेच नाव फायनल झाले आणि मतदान प्रक्रियेच्या १५ दिवस आधी लोखंडेंनी शिवबंध हाती बांधले. मात्र, त्यांचे मन व विचार नेहमीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व भाजपशी जवळचे राहिले. ते शिर्डीत सलग दोन वेळा खासदार झाले. मात्र, शिवसेनेत दोन गट पडताच लोखंडेंनी भाजपच्या गोटात गेलेल्या एकनाथ शिंदेंबरोबर जाणे पसंत केले.

हे देखील वाचा : नगर जिल्ह्यात अलर्ट; जिल्हादंडाधिकाऱ्यांचे प्रतिबंधात्मक आदेश लागू 

मतदारांची नाराजी
सदाशिव लोखंडे हे शिर्डी मतदार संघात दिसत नाहीत. केंद्रीय मंत्रालयाच्या एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी एक दिवस येतात आणि निघून जातात, परत दिसत नाहीत. सामान्यांना भेटता येत नाही, अशा तक्रारी २०१९च्या निवडणुकीच्या वेळीही व आताही शिर्डी मतदार संघात मतदार करतात. तरीही शिवसेनेने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना २०१९ला तिकीट दिले होते. तरीही त्यांनी शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केल्याचा आरोप ठाकरे गटातील शिवसैनिक करत आहेत. या मतदार संघात शिंदे गटापेक्षा ठाकरे गटाची मोठी ताकद आहे. वाढती नाराजी पाहता लोखंडेंचा निवडणुकीत पराभव होईल, अशी चर्चा आहे. यावर लोखंडेंनी उपाय शोधून काढला आहे.

नक्की वाचा : राजूर प्रदर्शनात इगतपुरीच्या भोसलेंचा वळू ठरला चॅम्पियन


नव्या राजकीय खेळीची तयारी
सदाशिव लोखंडेंची मलीन होत असलेली प्रतिमा, भाजपकडून शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी नवा उमेदवार निवडण्याची सुरू असलेली तयारी, शिर्डी मतदारसंघ शिंदे गटाला न मिळण्याची शक्यता, यावर लोखंडेंनी उपाय शोधायला सुरूवात केली आहे. त्यांच्या या पवित्र्याकडे नवी राजकीय खेळी म्हणून पाहिले जात आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघाप्रमाणे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदार संघात भाजपचा उमेदवार कधीच निवडून आलेला नाही. त्यामुळे या मतदार संघाचे तिकीट सदाशिव लोखंडे तीन मुलांपैकी एकाला मिळवून देण्यासाठी प्रयत्नरत असल्याची चर्चा आहे. त्यासाठी त्यांनी एक खासगी कार्यक्रम उद्या (गुरुवारी) श्रीरामपूर येथे ठेवला आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निमंत्रित केले आहे. हा कार्यक्रम म्हणजे लोखंडेंच्या नव्या राजकीय डावाची पूर्व तयारी व शक्तिप्रदर्शन करण्यात येणार असल्याची चर्चा सध्या नगर जिल्ह्यात आहे.


काँग्रेसमधील अंतर्गत धुसफूस
श्रीरामपूर विधानसभा मतदार संघात लहू कानडे हे काँग्रेसचे आमदार आहेत. या मतदार संघात काँग्रेसचे नेहमीच वर्चस्व राहिले आहे. फक्त एकदाच काँग्रेसला या मतदार संघात पराभव पहावा लागला. १९९० च्या निवडणुकीत ज्येष्ठ नेते भानुदास मुरकुटे यांनी जनता दलाच्या तिकीटावर निवडणूक लढवत काँग्रेसचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांचा पराभव केला होता. हा अपवाद वगळता काँग्रेसला नेहमीच या मतदार संघात यश मिळाले. मात्र, यंदा श्रीरामपूरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांत दोन गट दिसून येत आहेत. लहू कानडेंचे युवा नेते करण ससाणे यांच्याशी पटत नसल्याचे सांगितले जाते. दोन्ही गटांतील मतभेद पक्षाच्या कार्यक्रमांतूनही दिसून आले आहेत. याचा फायदा लोखंडे घेऊ पाहत असल्याची चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीला सात-आठ महिने अवकाश आहे. तत्पूर्वी श्रीरामपूरमध्ये राजकीय खेळ्या सुरू झाल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here