
Sanjay Yenpure : नगर : जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे (Crime) जिल्ह्याची प्रतिमा मलिन होत आहे. त्यामुळे गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कोणताही राजकीय दबाव न घेता कठोर कारवाई करा, असे निर्देश नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय येनपुरे (Special Inspector General of Police Sanjay Yenpure) यांनी जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांना (Police Officer) दिले. ते म्हणाले, “कायद्याच्या अंमलबजावणीत कोणीही अडथळा आणत असेल, तर त्याची पर्वा करू नका. कायद्याने जे योग्य आहे तेच करा. गुन्हेगारांवर कारवाई करताना कोणत्याही प्रकारच्या दबावाला बळी पडू नका. अशा कारवाईत संबंधित अधिकाऱ्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू.”
सलग चार दिवस पाळण्यात आला होता बंद
श्रीरामपूर येथील हॉटेल व्यावसायिक आकाश दुबय्या यांच्या खूनप्रकरणानंतर शहरात सलग चार दिवस बंद पाळण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक येनपुरे यांनी बुधवारी (ता. १५) अहिल्यानगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट दिली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी उपस्थित (Sanjay Yenpure)
यावेळी त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीची सविस्तर समीक्षा केली. बैठकीस पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्यासह सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी आणि पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत जिल्ह्यात डोके वर काढणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली. गुन्हा घडल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा गुन्हा घडू नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर अधिक भर देण्याच्या सूचना येनपुरे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.


