Sharad Rao Mankeshwar : नगर : शहरातील ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ (Senior Educationist), निवृत्त प्राचार्य तथा अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या (AES) विविध शैक्षणिक संस्थांमध्ये दीर्घकाळ सेवा बजावलेले शरदराव दत्तात्रय माणकेश्वर (Sharad Rao Mankeshwar) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने नगरच्या शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा पसरली असून, शिक्षण क्षेत्रातील एक अभ्यासू, कर्तव्यदक्ष आणि विद्यार्थीप्रिय व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना विविध मान्यवरांनी व्यक्त केली.
नक्की वाचा : कामरगाव परिसरात जुगार अड्ड्यावर छापा ; तीन लाख ६९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
नॉन-टीचिंग स्टाफ म्हणून सेवेला प्रारंभ
शरदराव माणकेश्वर यांनी सन 1960 मध्ये अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलमध्ये नॉन-टीचिंग स्टाफ म्हणून आपल्या सेवेला प्रारंभ केला. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाची ओढ कायम ठेवत त्यांनी बाह्य शिक्षणाद्वारे स्वतःचे उच्च शिक्षण पूर्ण केले. आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या बळावर त्यांनी संस्थेतील विविध पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या. शिक्षण क्षेत्रातील प्रामाणिक कार्याची दखल घेत त्यांची पुढे बी.एड. महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती झाली. आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी शैक्षणिक गुणवत्ता, शिस्त आणि विद्यार्थीकेंद्री शिक्षणपद्धतीचा सातत्याने पुरस्कार केला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सेवानिवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य (Sharad Rao Mankeshwar)
इंग्रजी विषयावर त्यांचे विशेष प्रभुत्व होते. सोनई येथील श्री शनेश्वर विद्यामंदिरमध्ये त्यांनी इंग्रजी विषयाची भक्कम पायाभरणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजी विषयाची भीती दूर व्हावी, त्यांना आत्मविश्वासाने भाषा आत्मसात करता यावी, यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी विनामूल्य मार्गदर्शन केले. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावे लागू नये, यासाठीही त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. सेवानिवृत्तीनंतरही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचे कार्य त्यांनी अखंडपणे सुरू ठेवले. त्यांच्या पश्चात पत्नी मुलगा, मुलगी, सुन, जावई, नातवंडे, पंतू असा मोठा परिवार आहे.



