Shevgaon : नगर : जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने आणि तीव्र वादळी वाऱ्याने प्रचंड थैमान घातले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा सर्वात मोठा फटका तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना बसला असून, शेतातील सौरऊर्जेवर चालणाऱ्या सोलर पंपांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळाच्या तीव्रतेमुळे कोट्यवधी रुपयांचे सोलर पॅनेल्स तुटून आणि उन्मळून पडल्याने बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडला आहे.
हेही वाचा : तंबूत शिरून मौल्यवान वस्तूंची चोरी; सकाळी उठताच पर्यटकांच्या ‘डोळ्यासमोर काजवे’
आर्थिक गणित कोलमडले
नुकत्याच झालेल्या वादळी पावसात शेवगाव तालुक्यातील आव्हाने खुर्द, आव्हाने बुद्रुक, शहापूर, आणि बर्हाणपूर परिसराला याचा सर्वाधिक फटका बसला. या परिसरातील शेतांमध्ये बसवण्यात आलेले सोलर पॅनेल्स वाऱ्याच्या प्रचंड वेगाने थेट हवेत उडून गेले, तर अनेक ठिकाणी ते जमिनीवर कोसळून फुटले आहेत. पारंपरिक विजेला पर्याय म्हणून आणि दिवसा सिंचन करता यावे यासाठी शासनाच्या विविध योजनांमधून तसेच स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून शेतकऱ्यांनी शेतात सोलर पंप बसवले होते. मात्र, या एकाच वादळाने शेतकऱ्यांचे संपूर्ण आर्थिक गणित कोलमडून टाकले आहे.
नक्की पहा : लाडक्या बहिणींना मे महिन्याचे १५०० रुपये ‘या’ तारखेला मिळणार?
शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न (Shevgaon)
अनेक शेतकऱ्यांचे सोलर पॅनेल्स पूर्णपणे फुटले असून ते आता वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत. लोखंडी अँगल आणि खांबांसह संपूर्ण सोलर यंत्रणा अनेक ठिकाणी मुळासकट उखडून पडली आहे. ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर आणि पेरणीच्या पूर्वतयारीच्या वेळीच सोलर पंप निकामी झाल्यामुळे आता पिकांना पाणी कसे द्यायचे, असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.



