
Shirdi Police Station : शिर्डी : शिर्डी पोलीस ठाण्याच्या (Shirdi Police Station) हद्दीत मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांविरोधात (Theft case) पोलिसांनी एक मोठी आणि दमदार कारवाई केली आहे. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या विविध भागांतून चोरीला गेलेले नामांकित कंपन्यांचे ५५ महागडे मोबाईल शिर्डी पोलिसांनी हस्तगत केले आहेत. जप्त करण्यात आलेल्या या मोबाईलची एकूण किंमत १८,३४,००० रुपये (१८ लाख ३४ हजार) इतकी आहे.
अंधाराचा फायदा घेत आरोपी पसार; बॅगेत सापडला मुद्देमाल
मिळालेल्या माहितीनुसार, २९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास वरिष्ठांच्या आदेशानुसार शिर्डी पोलीस ठाण्याचे पथक परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान, राहाता तालुक्यातील दत्तनगर, शिर्डी येथील एका घरात काही दिवसांपूर्वी झारखंडवरून आलेले काही इसम राहत असून त्यांच्या हालचाली संशयास्पद असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने या ठिकाणी छापा टाकला. पोलीस आल्याचे पाहताच दोन संशयित आरोपी घराच्या मागच्या दरवाजातून अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांंनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र अंधारामुळे ते सापडू शकले नाहीत. पोलिसांनी घटनास्थळाची दोन पंचांसमक्ष पाहणी केली असता, तिथे एक संशयास्पद बॅग मिळून आली. या बॅगेची झडती घेतली असता, त्यात १८ लाख ३४ हजार रुपये किमतीचे विविध नामांकित कंपन्यांचे ५५ मोबाईल आढळून आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
गुन्हा दाखल, पोलिसांकडून पुढील तपास सुरू (Shirdi Police Station)
याप्रकरणी शिर्डी पोलिसांनी सर्व मुद्देमाल जप्त केला असून पळून गेलेल्या अज्ञात आरोपींविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गु. र. नं. ८६१/२०२६, महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२२ व १२४ प्रमाणे ३० सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे ०३:१८ वाजता गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल लांडे (बकल नं. १४३२) करत आहेत.
या पथकाने केली दमदार कामगिरी
सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुमक्का सुदर्शन, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ वाघचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. रणजीत गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक कल्पेश कुमार चव्हाण, पीएसआय सागर काळे, पीएसआय महादेव गुट्टे, पीएसआय प्रदीप बोऱ्हाडे, महिला पीएसआय आकांक्षा जाधव, पोहेकॉ लांडे, पोहेकॉ संतोष वाघ, पोहेकॉ अण्णासाहेब दातीर, पोहेकॉ चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव नालेगावकर, प्रसाद सूर्यवंशी, इनामदार, केवलसिंग राजपूत, दिघे, दिनेश कांबळे, प्रमोद जाधव, अजय अंधारे, कोतकर तसेच श्रीरामपूर अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पोहेकॉ सचिन धनाड आणि पोलीस मित्र योगेश शिंदे यांच्या संयुक्त पथकाने केली आहे.


