Shiv Sena : शिवसेनेचा दोन्ही लोकसभा मतदारसंघावर दावा; नगर विधानसभा मतदार संघही हवा

0
Shiv Sena
Shiv Sena

Shiv Sena : नगर : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षा (BJP) कडून जोरदार तयारी सुरू आहे. दुसरीकडे नगरमध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena (UBT)) गटाने रविवारी (ता. २८) शिवसेना (Shiv Sena) कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याच्या तयारीसाठी झालेल्या बैठकीत शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीसाठीच्या तयारीचा आढावा घेतला. शिवसेनेकडे नगर दक्षिणसाठी सक्षम उमेदवार संपर्कात आहेत. त्यामुळे शिवसेनेने लोकसभेच्या नगर जिल्ह्यातील दोन्ही जागा लढवाव्यात, अशी मागणी जिल्ह्यातील नेते व कार्यकर्त्यांनी केली. त्यानुसार या बैठकीचा अहवाल शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला जाणार आहे, असे आमदार सुनील शिंदे यांनी सांगितले.

हे देखील वाचा : नगर-कल्याण रस्त्यावर भीषण अपघात; सहा जणांचा जागीच मृत्यू

पदाधिकाऱ्यांची उपस्थिती (Shiv Sena)


बैठकीला शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख आमदार सुनील शिंदे, जिल्हा प्रमुख राजेंद्र दळवी, उप जिल्हा प्रमुख संदेश कार्ले, गिरीश जाधव, शहर प्रमुख संभाजी कदम, माजी महापौर भगवान फुलसौंदर, युवा नेते विक्रम राठोड, माजी उपमहापौर अनिल बोरूडे, संदीप दातरंगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, एसटी कामगार नेते सुरेश क्षीरसागर, कामगार नेते अशोक दहिफळे, स्मिता अष्टेकर आदी उपस्थित होते.

नक्की वाचा: आता माघार नाही, आरक्षण घेऊनच मागे परतणार : मनोज जरांगे पाटील

खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा


बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार शिंदे यांनी सांगितले की, शिवसेना खासदार संजय राऊत एक वेगळी ऊर्जा आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी (ता. २८) शिवसेनेचा नगर दक्षिण कार्यकर्ता मेळावा होईल. शिवसेनेचे कार्यकर्ते व नेते यांच्यात सातत्याने संपर्क हवा. संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न होणार आहेत. शिवसेनेतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर आमचा विश्वास आहे. एवढे सक्षमपणे काम करणारे कार्यकर्ते दुसऱ्या पक्षात नाहीत. कार्यकर्त्यांची शिवसेनेला कमी नाही. कार्यकर्त्यांच्या जीवावर निवडणूक जिंकण्यात आमचे नेते सक्षम आहेत, असे त्यांनी ठामपणे सांगितले. 

अवश्य वाचा : रामदास आठवलेंचा नगर दाैऱ्याआधी आरपीआय गटात घमासान

महाविकास आघाडीत नगर विधानसभा मतदारसंघसह इतर मतदार संघांचीही मागणी (Shiv Sena)


या बैठकीला शिवसेनेमध्ये नव्याने उपनेते झालेले साजन पाचपुते अनुपस्थित होते. या संदर्भात आमदार सुनील शिंदे म्हणाले, शिवसेनेत साजन पाचपुते नव्याने आले आहेत. ते भविष्यात मोठी जबाबदारी पारपाडतील. नाशिक येथील शिवसेना मेळाव्याला ते उपस्थित होते. त्यांना पक्ष संघटना समजायला वेळ लागेल. नगर जिल्ह्यात शिवसेनेचे आमदार कमी झाले म्हणून पक्षाची ताकद कमी झालेली नाही. सर्व मतदारांची टक्केवारीचा विचार करून महाविकास आघाडीत जागा वाटपातून नगर विधानसभा मतदारसंघसह इतर मतदार संघांचीही मागणी करू. नगरमध्ये दिवंंगत माजी मंत्री अनिल राठोड यांना मानणारा मोठा वर्ग आहे. महापालिकेतही शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे ही जागा शिवसेनेच्या वाट्याला यायला हवी, असे त्यांनी ठामपणे सांगितले.


शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या संपर्कात नगर लोकसभा मतदार संघातील मोठा नेता संपर्कात आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदार संघात निवडणूक जिंकेल, असे तीन उमेदवार आमच्याकडे आहेत. शिर्डीची जागा आमचीच आहे. दक्षिणेत आमच्याकडे चांगले उमेदवार आहेत. निवडून येण्याच्या ताकदीचे ते उमेदवार आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यातील शिर्डी व नगर अशा दोन्ही लोकसभा मतदार संघातून शिवसेनेने निवडणूक लढवावी, अशी मागणी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात येणार आहे. आमच्या संपर्कात असलेले ‘वजनदार उमेदवार’ योग्य वेळी दिसतील, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here