Shri Gurudev Datta : श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली

Shri Gurudev Datta : श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली

0
Shri Gurudev Datta : श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली
Shri Gurudev Datta : श्री गुरुदेव दत्तच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली

Shri Gurudev Datta : नेवासा : दिगंबरा… दिगंबरा.. श्रीपाद वल्लभ.. दिगंबरा असा जयघोष व पुष्पांची वृष्टी… शंखाचा निनाद, तोफांची सलामी व फटाक्यांची आतषबाजी करत नेवासा तालुक्यातील भू-लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री क्षेत्र देवगड (Sri Kshetra Devgad) येथे श्री दत्तजन्म सोहळा मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज (Bhaskargiriji Maharaj) यांच्या हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली. यावेळी झालेल्या जन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी दत्त नामाच्या जयघोषाने देवगड नगरी दुमदुमली होती. दत्त जन्मोत्सवाच्या निमित्ताने लाखो भाविकांनी श्री भगवान दत्तात्रयांचे (Shri Gurudev Datta) दर्शन घेतले.

हे देखील वाचा : वाढत्या कोरोनामुळे देवेंद्र फडणवीसांनी केले हे आवाहन


श्री दत्तजयंती उत्सवाच्या निमित्ताने श्री गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत श्री भास्करगिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पहाटेच्या सुमारास भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीस वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला. यावेळी सकाळी श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या पालखीची मंदिर प्रदक्षिणा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये गुरुवर्य श्री भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या समवेत हातात भागवत धर्माची पताका घेतलेले वारकरी, टाळ मृदुंगाचा गजर करणारे भजनी सेवेकरी, सहभागी झाले होते.

हे देखील वाचा : कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी डॉ. सुजय विखे पाटील उठविणार आवाज


दुपारच्या सत्रात ब्रम्हवृंद मंडळींच्या उपस्थितीत पाच दिवस यज्ञ मंडपात चाललेल्या श्री दत्त यागाची सांगता गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते विधिवत पूजेने होमकुंडात श्रीफळ अर्पण करून पूर्णाहुती देऊन करण्यात आली. यावेळी दत्त यागाचे पौरोहित्य करणाऱ्या सर्व ब्रम्हवृंद मंडळींचा पाची पोषाख देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी दत्त यागामध्ये स्थापित केलेल्या भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीची ब्रम्हवृंद मंडळींच्या उपस्थितीत वाजत गाजत प्रवरा नदी तीरावर नेण्यात आली. तेथे अवधूत स्नानाचा धार्मिक विधी वेदमंत्राच्या जयघोषात पार पडला.


दत्तजयंती निमित्त पहाटे पासूनच गर्दीचा ओघ मोठ्या प्रमाणात दिसून आला. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शन बारीत उभे राहून नियमांचे पालन करत भगवान दत्तात्रयांसह श्री किसनगिरी बाबा समाधी मंदिर, पंचमुखी सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. यावेळी गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबा व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराजांनी दत्तजयंती निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या भक्तांसी सुसंवाद साधत हसतमुखाने स्वागत केले. सायंकाळी ६ वाजता झालेल्या श्री दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी गुरुवर्य भास्करगिरी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पुष्पांनी सजविण्यात आलेल्या पाळण्यातील भगवान दत्तात्रयांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. गुरुवर्य भास्करगिरी बाबांच्या हस्ते विधिवत पूजन झाल्यानंतर स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, महंत कैलासगिरीजी महाराज, महंत सुनीलगिरी महाराज, महंत रमेशानंदगिरी महाराज, महंत बालयोगी ऋषिनाथजी महाराज, महंत गणेशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी शांतीपाठ म्हणण्यात आला. यावेळी गुरुवर्य श्री भास्करगिरी बाबा यांच्यासह त्यांच्या मातोश्री सरुबाई पाटील, स्वामींच्या मातोश्री मीराबाई मते, शालिनीताई विखे पाटील व उपस्थित संत महंतांचे हस्ते पाळण्याची दोरी ओढण्यात आली. नेवासा येथील गायिका माधुरीताई कुलकर्णी यांनी दत्त जन्माचा पाळणा म्हटला. त्यांना शिक्षिका सुप्रिया इंगळे, ज्ञानेश्वर काळे व सहकाऱ्यांनी संगीत साथ दिली.


यावेळी झालेल्या दत्त जन्म सोहळयाच्या प्रसंगी नगर जिल्हा कोर्टाचे न्यायाधीश पाटील, चव्हाण, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ, प्रांताधिकारी सुधीर पाटील, आमदार माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी आमदार पांडुरंग अभंग, बाळासाहेब मुरकुटे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे, काशिनाथ नवले, उद्योजक बापूसाहेब नजन, सुधाकरराव आव्हाड, छत्रपती शिवाजीराजे ग्रामसेवक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष सुदामराव बनसोडे, विश्व हिंदू परिषदेचे आप्पा बारगजे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर व भाविक उपस्थित होते.


 भगवान दत्तात्रयांचा जन्म सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्यानंतर उपस्थित भाविकांना मंदिर परिसरात असलेल्या अन्नपूर्णा मैदानात आमटी भाकरी प्रसादाचे वाटप करण्यात आले. दत्तजयंती निमित्ताने  मंदिर परिसरात मोठी यात्रा भरली होती. या यात्रेमध्ये विविध प्रकारची स्टॉल दुकानदारांनी थाटली होती. नेवासा पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य तपासणी करून मोफत औषधे गोळ्या देण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here