
Shridonda Politics : नगर : डिंभे-माणिकडोह जोडबोगद्याच्या मुद्द्यावरून अहिल्यानगरच्या राजकारणात आधीच वातावरण तापलेले असताना आता श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाला नवा ट्विस्ट मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बोगद्याच्या कामाला स्थगिती मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते घनःशाम शेलार यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता श्रीगोंदा तालुक्यातील राष्ट्रवादीच्या इतर प्रमुख नेत्यांची पुढची भूमिका काय असेल, याची चर्चा सुरू झाली आहे. डिंभे-माणिकडोह बोगद्यावरून श्रीगोंदा तालुक्यातील विविध राजकीय नेत्यांनी वेळोवेळी भूमिका घेतली आहे. मात्र या प्रकल्पाच्या कार्यवाहीला राज्य मंत्रिमंडळाने स्थगिती दिल्याने या निर्णयामागे पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचा बोगद्याला असलेला विरोध हा प्रमुख राजकीय मुद्दा ठरला आहे.
जिल्हा बँकेची अंतिम मतदार यादी प्रसिद्ध; ‘पिशवीतील’159 मतदार वधारले
राहुल जगताप, नागवडे, पानसरे काय करणार?
याच ठिकाणी आता सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो. माजी आमदार राहुल जगताप आणि राजेंद्र नागवडे यांनी २०२५ मध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांच्या वडिलांनी म्हणजेच ज्येष्ठ नेते स्व. कुंडलिक तात्या जगताप आणि स्व. शिवाजीराव नागवडे यांनी त्यांच्या हयातीत या बोगद्यासाठी आयुष्यभर पुण्यातील नेत्यांशी संघर्ष केला. दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहटा हेही अजित पवार गटाशी संबंधित प्रमुख श्रीगोंदा नेते म्हणून राजकारणात सक्रिय आहेत. बाळासाहेब नाहाटा हे सध्या आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलिसांच्या ताब्यात आहेत. मात्र या विषयावर इतर नेत्यांची भूमिका शेतकऱ्यांना आत्मचिंतन करायला लावणारी आहे.
राष्ट्रवादीचे नेते आणि शेतकऱ्यांमध्ये अंतर? (Shridonda Politics)
घनःशाम शेलार यांच्या भूमिकेनंतर आता या सर्व नेत्यांसमोर मूलभूत प्रश्न उभा राहतो, डिंभे-माणिकडोह बोगद्याच्या मुद्द्यावर पक्षाची भूमिका आणि स्थानिक शेतकऱ्यांची भूमिका यामध्ये अंतर निर्माण झाले तर त्याची राजकीय किंमत कोणाला मोजावी लागणार? हा प्रश्न केवळ बोगद्यापुरता मर्यादित नाही. श्रीगोंद्यात राष्ट्रवादीने गेल्या काही काळात राहुल जगताप, राजेंद्र नागवडे, घनःशाम शेलार, दत्तात्रय पानसरे, बाळासाहेब नाहाटा आणि भगवानराव पाचपुते अशा विविध स्थानिक नेत्यांना एकत्र आणून संघटन मजबूत करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या विषयावर शेतकऱ्यांच्या बाजूने शेलार वगळता एकही नेता पुण्याच्या नेत्यांविरोधत भूमिका घ्यायला तयार नाही. तालुक्यात शेतकऱ्यांची एकजूट होत असताना नेते मात्र जिल्हा बँकेची समीकरणे जुळविण्यात व्यस्त असल्याची चर्चा आहे.
कोपरगाव मध्ये भुताची अफवा; परिसरात भीतीचे वातावरण
बोगदा श्रीगोंद्याच्या राजकारणाचा नवा ‘टर्निंग पॉइंट’? (Shridonda Politics)
डिंभे-माणिकडोहचा प्रश्न गेल्या काही दशकांपासून श्रीगोंद्याच्या राजकारणात सातत्याने उपस्थित आहे. आता मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर हा प्रश्न पुन्हा राजकीय केंद्रस्थानी आला आहे. एका बाजूला पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विरोध, तर दुसऱ्या बाजूला अहिल्यानगरमधील दुष्काळी भागासाठी पाण्याची मागणी या दोन भूमिकांमध्ये राजकीय संघर्ष तीव्र झाला आहे. त्यामुळे घनःशाम शेलार यांच्या निर्णयानंतर श्रीगोंदा राष्ट्रवादीत पुढचा डाव कोण टाकणार, कोण पक्षासोबत राहणार आणि कोण स्थानिक पाणीप्रश्नाला प्राधान्य देणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


