Shrigonda News : ‘वंशाचा दिवा’ नव्हे, विचारांची मशाल! श्रीगोंद्यात आईच्या पार्थिवाला मुलींचा खांदा

0
Shrigonda News : ‘वंशाचा दिवा’ नव्हे, विचारांची मशाल! श्रीगोंद्यात आईच्या पार्थिवाला मुलींचा खांदा

श्रीगोंदा : आई वडिलांचा वारसा आणि संस्कार हे मुलंच पुढे चालवतात असं आपण म्हणतो पण आजचा काळ आपल्याला सांगतो की, फक्त मुलंच नाही तर मुलीही आई वडिलांचे संस्कार जपू शकतात, त्याही आई वडिलांची सगळी जबाबदारी घेतात. मात्र आजही काही ठिकाणी मुलगाच वंशाचा दिवा मानणाऱ्या समाजामध्ये या रूढ समजुतीला व पारंपरिक विचारांना छेद देणारी एक पुरोगामी घटना श्रीगोंदा (Shrigonda News) शहरात घडली आहे. सामाजिक कार्यकर्त्या संगीता रामभाऊ खामकर यांच्या निधनानंतर (Sangeeta Khamkar passes away) त्यांच्या मुलींनी आईच्या पार्थिवाला स्वतः खांदा (Daughters shouldered their mother’s mortal remains) देत व मुखाग्नी देऊन अंत्यसंस्काराची सर्व जबाबदारी अत्यंत धैर्याने पार पाडली.

नक्की वाचा : जामखेडच्या कला केंद्रातील अंतर्गत वाद, मारहाण अन्…,बेशुद्ध असलेल्या गर्भवती महिलेची निर्घृण हत्या

संगीता खामकर यांचं कार्य (Shrigonda News)

घारगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या संगीता खामकर (वय ६०) यांचे नुकतेच आजारपणाने निधन झाले. संगीताबाई यांनी आयुष्यभर महिला सक्षमीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन आणि सामाजिक प्रबोधनाच्या चळवळीत स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. खामकर दाम्पत्य हे पुरोगामी विचारसरणीचे आहे. त्यांनी मुलगा-मुलगी हा भेद कधीच मानला नाही. मुलगा नसल्याची खंत न बाळगता दोन्ही मुली स्वरांजली व प्रांजली यांना चांगले शिकवले. त्यांची मुलगी स्वरांजली ज्ञानदेव वाघ-खामकर या सोलापूरला सहायक पोलिस निरीक्षक आहेत, तर प्रांजली प्रमोद शिंदे-खामकर या अहिल्यानगर शहर पोलिस दलात कार्यरत आहेत.

अवश्य वाचा : कोपर्डी अत्याचार प्रकरण; उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींना घटनास्थळाची पाहणी का करायची?

स्वर्गीय संगीता खामकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य सत्यशोधक विचार आणि वंचितांच्या हक्कांसाठी समर्पित केलं होतं. त्या काळात दोन मुलींनंतर कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया करून घेणे आणि मुलगा नसल्याची सामाजिक मानसिकता स्वीकारणे सोपे नव्हते. मात्र संगीता खामकर यांनी या मानसिकतेला न जुमानता आपल्या दोन्ही मुलींना उच्च शिक्षण दिले आणि स्वावलंबी बनवले. आईकडूनच त्यांना सामाजिक जाणीव, धाडस आणि नेतृत्वाची प्रेरणा मिळाली आणि पुढे त्यांनी ती आपल्या कार्यातून सिद्ध करून दाखवली. संगीता खामकर यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी आणि उद्योजक बनवण्यासाठी महिला बचत गटांची स्थापना केली.

नगर जिल्ह्यात राज्यस्तरीय महिला कुस्ती स्पर्धेचे आयोजन, विधवा महिलांच्या पुनर्विवाहासाठी पुढाकार तसेच घारगावमध्ये दारूबंदी आणि माळवाडी रस्त्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. संगीता खामकर यांनी आयुष्यभर आपल्या आचरणातून रूढी-परंपरांना प्रश्न विचारला. त्यांनी कधीच दागिने घातले नाहीत. महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांना त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले. आपल्या दोन्ही मुलींचे विवाह त्यांनी सत्यशोधक पद्धतीने लावून देत सामाजिक परिवर्तनाची सुरुवात त्यांनी स्वतःच्या घरापासून केली.

आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ मुली करणार सहा विविध वृक्षांची लागवड (Shrigonda News)

संगीता खामकर यांच्या अंत्यविधीच्या वेळी त्यांच्या विचारांची आणि सामाजिक भूमिकेची छाप प्रकर्षाने जाणवली. त्यांच्या पार्थिवाला महिलांनी खांदा दिला. सगळ्यात भावुक करणारा क्षण म्हणजे त्यांच्या मुलीने आईच्या  पार्थिवाला खांदा दिला आणि स्वतः अग्निडाग देऊन अखेरचा निरोप दिला. हा केवळ अंत्यविधी नव्हता तर ही एका आईने आयुष्यभर जपलेल्या सत्यशोधक विचारांना तिच्या मुलीने दिलेली अखेरची मानवंदना होती. आता संगीता यांच्या अस्थींच विसर्जन करण्याऐवजी आईच्या स्मृतीप्रीत्यर्थ सहा विविध वृक्षांची लागवड करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांच्या मुलींनी घेतला. सोबतच त्यांचा पुढील दशक्रिया विधी कर्मकांडाला फाटा देऊन सत्यशोधक पद्धतीनेच करण्याचा दृढ संकल्प खामकर कुटुंबाने केला आहे.