Sport News : कर्जत तालुक्यातील पाटेगावच्या सुपुत्राची ऐतिहासिक कामगिरी; AVC आशिया व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय संघाला ४० वर्षांनंतर पदक

0
Sport News : कर्जत तालुक्यातील पाटेगावच्या सुपुत्राची ऐतिहासिक कामगिरी; AVC आशिया व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय संघाला ४० वर्षांनंतर पदक
Sport News : कर्जत तालुक्यातील पाटेगावच्या सुपुत्राची ऐतिहासिक कामगिरी; AVC आशिया व्हॉलीबॉल स्पर्धेत भारतीय संघाला ४० वर्षांनंतर पदक

Sport News : नगर : कर्जत तालुक्यातील पाटेगाव येथील सुपुत्र ओम वसंत लाड यांनी आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. नुकत्याच पार पडलेल्या प्रतिष्ठित ‘AVC आशिया व्हॉलीबॉल कप २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय संघाने तब्बल ४० वर्षांनंतर ऐतिहासिक पदक जिंकत देशाचा गौरव वाढवला. या भारतीय संघात पाटेगावच्या ओम लाड यांनी देशाचे प्रतिनिधित्व करत मैदानावर अष्टपैलू कामगिरी बजावली. त्यांच्या या नेत्रदीपक यशामुळे संपूर्ण महाराष्ट्रासह अहिल्यानगर जिल्ह्याचे नाव क्रीडा जगतात अभिमानाने उंचावले आहे.

हेही वाचा : पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वाहनांना टोलमाफी; ६ ते २९ जुलैदरम्यान सवलत लागू

४० वर्षांचा दुष्काळ संपला

आशियाई पातळीवरील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत भारतीय संघाने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. गेल्या चार दशकांपासून (४० वर्षे) भारताला या स्पर्धेत पदकाने हुलकावणी दिली होती. मात्र, २०२६ च्या या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला. ओम लाड यांनी मोक्याच्या क्षणी गुण वसूल करत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले.

नक्की पहा : अहिल्यानगरमधील रोहित्रे की यमपाश? महावितरण प्रशासनाचा असाही कारभार

गावात आणि जिल्ह्यात आनंदाचे वातावरण (Sport News)

ओम यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाची बातमी समजताच कर्जत तालुका आणि पाटेगाव परिसरात फटाक्यांची आतषबाजी करत आणि पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला. एका ग्रामीण भागातून पुढे येत थेट भारतीय संघात स्थान मिळवणे आणि देशासाठी ऐतिहासिक पदक जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलणे, ही सर्वच नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायी बाब ठरली आहे. त्यांच्या या यशाबद्दल राजकीय, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांकडून ओम लाड यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.