ST Bus : नगर : युद्धामुळे जागतिक पातळीवर तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतातही इंधन दरवाढ (Fuel Price Hike) करण्यात आली. त्यामुळे एसटी बसच्या (ST Bus) तिकीटात वाढ होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. अशातच डिझेलच्या (Diesel) दरवाढीच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील दालनात महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी परिवहन मंत्र्यांनी तिकीट दरवाढीचे संकेत दिले आहेत.
नक्की वाचा : शिर्डीत खासगी क्षेत्रातील देशातील सर्वात मोठ्या संरक्षण कारखान्याचे २३ मे रोजी संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
डिझेलच्या किमतीत झालेल्या वाढीने महामंडळावर ताण
यावेळी बोलताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे महामंडळावर वार्षिक सुमारे १२४ कोटी रुपयांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे. एसटी महामंडळाला दररोज सरासरी १०.८७ लाख लिटर डिझेलची आवश्यकता भासते. सध्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमार्फत डिझेलचा पुरवठा केला जात असून, मागील आठवड्यात प्रति लिटर ८८.२१ रुपये असलेला दर आता वाढून ९१.३१ रुपये झाला आहे. त्यामुळे प्रति लिटर ३ रुपये १० पैशांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
एसटीची भाडेवाढ विचाराधीन (ST Bus)
या दरवाढीमुळे महामंडळाला दररोज अंदाजे ३३ लाख ७० हजार रुपयांचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत असून, मासिक स्तरावर हा भार सुमारे १० कोटी रुपये, तर वार्षिक स्तरावर सुमारे १२४ कोटी रुपयांपर्यंत जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वाढत्या इंधन खर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी भाडे वाढीचा प्रस्ताव विचाराधीन असला, तरी तत्काळ भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची माहिती यावेळी प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.
सरनाईक म्हणाले की
सरनाईक पुढे म्हणाले की, एसटी महामंडळ सध्या आर्थिक अडचणींचा सामना करीत असून, एप्रिल २०२६ या महिन्यात महामंडळाला सुमारे ७६ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. वाढत्या इंधन खर्चाचा थेट परिणाम महामंडळाच्या आर्थिक स्थितीवर होत असून, भविष्यात प्रवासी भाडेवाढीचा निर्णय घेणे आवश्यक ठरू शकते. सध्या कोणतीही भाडेवाढ तातडीने लागू करण्यात येणार नसून, केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली इंधन दरवाढीच्या अनुषंगाने भाडेवाढीचा प्रस्ताव राज्य परिवहन प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे. संबंधित प्राधिकरणाची मान्यता मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.



