
Suicide : नगर : अहिल्यानगर येथील एमआयडीसी मधील एका कंपनीत कार्यरत असलेल्या मशीन ऑपरेटरने (Machine operator) वरिष्ठांच्या सततच्या मानसिक त्रासाला आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळून कंपनीतच गळफास (Suicide) घेऊन आपले जीवन संपवले. या प्रकरणी एम.आय.डी.सी. पोलीस ठाण्यात (M.I.D.C. At the police station) कंपनीचे दोन वरिष्ठ अधिकारी आणि कामगार युनियनच्या दोन पदाधिकाऱ्यांसह इतर अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : स्व. देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त हेरिटेज वॉकचे आयोजन
भदर्गे यांच्या खिशात सापडली सुसाईड नोट
सचिन आदिनाथ भदर्गे (वय ४६, रा. सावेडी, अहिल्यानगर) असे गळफास घेतलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी त्यांच्या पत्नी कल्पना सचिन भदर्गे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सचिन भदर्गे १९९७ पासून एका कंपनीत मशीन ऑपरेटर म्हणून काम करत होते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कंपनीतील अधिकारी समीर शेवाळे, प्लांट हेड पुरुषोत्तम ऋषी आणि इतर वरिष्ठ अधिकारी त्यांना कामाच्या ठिकाणी विनाकारण टोमणे मारून मानसिक त्रास देत होते, तसेच कंपनीतून काढून टाकण्याची धमकी देत होते. सचिन भदर्गे यांच्या खिशात पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली असून, त्यामध्ये “चूक नसतानाही पावलोपावली अपमानीत केले जात असल्याने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे”, असा उल्लेख आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वर्कर्स युनियनकडून सहकार्य न मिळाल्याचा आरोप (Suicide)
वरिष्ठांकडून होणाऱ्या या त्रासाबाबत सचिन भदर्गे यांनी वर्कर्स युनियन’चे जनरल सेक्रेटरी बाबासाहेब अर्जुन निर्मळ आणि उपाध्यक्ष विठ्ठल हंडोरे यांची भेट घेऊन त्यांना सर्व प्रकार सांगितला होता. युनियनने या प्रकरणात मध्यस्थी करून मदत करावी, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र, या पदाधिकाऱ्यांनी कंपनी प्रशासनाकडे किंवा संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत कोणतीही विचारणा केली नाही. युनियनकडून सहकार्य न मिळाल्याने भदर्गे यांचे मानसिक खच्चीकरण झाले होते, असा आरोप त्यांच्या पत्नीने फिर्यादीत केला आहे. ६ जून रोजी दुपारी नेहमीप्रमाणे सचिन भदर्गे हे त्यांच्या दुसऱ्या शिफ्टच्या ड्युटीसाठी कंपनीत गेले होते. त्यानंतर मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास त्यांनी कंपनीतच गळफास घेतल्याचे समोर आले. त्यांना तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
याप्रकरणी एम.आय.डी.सी. पोलिसांनी आरोपी समीर शेवाळे, पुरुषोत्तम ऋषी, बाबासाहेब निर्मळ आणि विठ्ठल हंडोरे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज निवृत्ती मोंढे करत असून, कंपनीतील सीसीटीव्ही फुटेज आणि संबंधित रेकॉर्डची तपासणी केली जात आहे.


