Theft : पाथर्डी : तालुक्यातील येळी येथील कराडवस्ती परिसरात अज्ञात चोरट्यांनी (Thieves) एका रात्रीत तब्बल २५ शेतकऱ्यांच्या सोलर पंप व विद्युत मोटर पंपावरील केबल चोरी (Theft) केल्याची घटना घडली आहे. या चोरीमुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पांडुरंग निवृत्ती कराड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलीस ठाण्यात (Pathardi police station) अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : भंडारदरा धरणातून प्रवरा नदीपात्रात एक हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
या शेतकऱ्यांच्या केबल चोरीला
१६ जुलैच्या रात्री ते १७ जुलैच्या पहाटेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी कराडवस्ती परिसरातील विहिरींवरील सोलर पंप व मोटर पंपांना जोडलेल्या विद्युत केबल कापून चोरून नेल्या. सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. या घटनेत पांडुरंग निवृत्ती कराड यांच्यासह दीपक कराड, एकनाथ कराड, बद्रीनाथ कराड, कचरू कराड, अमोल कराड, बाजीराव कराड, अशोक कराड, भारत कराड, नामदेव कराड, विश्वास कराड, शिवशंभू कराड, कृष्णा कराड, संदीप कराड, नामदेव पालवे, तुळशीराम पालवे, शिवनाथ पालवे, बापू पालवे, शरद कराड, आजीनाथ जायभाये, राम ढोले, निवृत्ती ढोले, सुधाकर ढोले, शोभा कराड आणि संगीता कराड अशा सुमारे २५ शेतकऱ्यांच्या सोलर पंपांच्या केबल चोरीला गेल्या आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पोलीस गस्त वाढवण्याची मागणी (Theft)
मात्र, या सर्वांपैकी अधिकृतरीत्या पांडुरंग निवृत्ती कराड यांनीच पोलिसांकडे फिर्याद दाखल केली असून, त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तालुक्यात केबल चोरीच्या घटना वारंवार घडत असतानाही अनेक शेतकरी पोलीस ठाण्याच्या प्रक्रियेमुळे तक्रार देण्यास पुढे येत नसल्याचे दिसून येते. केबलच्या लांबीनुसार एका शेतकऱ्याचे एक हजार ते दहा हजार रुपयांपर्यंत नुकसान होत आहे. गेल्या वर्षीही याच परिसरात अशाच प्रकारची चोरी झाली होती. त्यामुळे रात्रीची पोलीस गस्त वाढवून केबल चोरणाऱ्या टोळ्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी येळी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.



