Theft : पाथर्डी : शहरात आज (ता. १९) भरणाऱ्या आठवडा बाजारात (Weekly market) गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला. दिवसभरात सुमारे १० ते १३ नागरिकांचे मोबाईल चोरीला (Theft) गेल्याची माहिती समोर आली आहे. मेहेरटेकडी येथील भगवान हनुमंत दराडे यांचा तब्बल १ लाख ८४ हजार ९९९ रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेला. तसेच बचत गटाच्या महिलांच्या दुचाकीच्या डिक्कीतून ७० हजार रुपये रोख चोरट्यांनी लंपास केले. एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिनेही (Gold jewelry) चोरीला गेल्याची माहिती आहे.
नक्की वाचा : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी न्यायालयाचा निर्णय वेदनादायी; ‘अंनिस’कडून चिंता व्यक्त
अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरल्याची खात्री
बुधवारी आठवडा बाजार असल्याने पाथर्डी शहरात ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने नागरिक व महिला खरेदीसाठी येतात. बाजारतळ, भाजी मंडई परिसरात मोठी गर्दी होत असल्याने या गर्दीचा फायदा घेत चोरटे हातसफाई करीत आहेत. मोबाईल, रोख रक्कम व दागिने चोरीच्या घटनांमुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मेहेरटेकडी येथील शिवसेनेचे तालुका प्रमुख भगवान हनुमंत दराडे (वय ५८) हे दुपारी बाराच्या सुमारास भाजीपाला बाजारासाठी नगरपालिका कार्यालयासमोरील बाजारतळावर गेले होते. नगरपालिका परिसरात आल्यानंतर मुलाला फोन करण्यासाठी त्यांनी वरच्या खिशात हात घातला असता मोबाईल गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले.
बाजार परिसरात शोध घेऊनही मोबाईल मिळून आला नाही. त्यामुळे अज्ञात चोरट्याने मोबाईल चोरल्याची खात्री झाल्याने त्यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दराडे यांना एका व्यक्तीला गर्दीत धक्का लागल्यानंतर काही क्षणांत त्यांचा मोबाईल गायब झाल्याचे लक्षात आले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद (Theft)
श्रीकृष्ण बचत गटाच्या अध्यक्षा असलेल्या महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास वैयक्तिक कर्जासाठी बचत गटाच्या रकमेतून ७० हजार रुपयांचा धनादेश घेऊन त्या रुपाली विकास आगलावे यांच्यासोबत दुचाकीवरून बँक ऑफ महाराष्ट्रच्या शेवगाव रोड शाखेत गेल्या. दुपारी सव्वाबारा वाजता बँकेतून ७० हजार रुपये काढल्यानंतर ही रक्कम पर्समध्ये ठेवून त्या बचत गटाचे रेकॉर्ड दाखविण्यासाठी गेल्या.यानंतर नगरपालिका परिसरात दुचाकी उभी करून डिक्की उघडली असता पर्स गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरट्यांनी दुचाकीची डिक्की तोडून त्यातील ७० हजार रुपये रोख चोरून नेल्याचे स्पष्ट झाले. दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून चोरट्यांनी या महिलांचा बँकेपासून पाळत ठेवून ती चोरी केली.
बुधवारी दिवसभरात अनेक नागरिकांनी पोलिस ठाण्यात मोबाईल गहाळ झाल्याचे अर्ज देऊन दाखले घेतल्याची माहिती आहे. याशिवाय भाजी मंडईत एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिनेही चोरीला गेल्याचे सांगण्यात आले. मात्र सोन्याच्या खरेदीच्या पावत्या नसल्याने तक्रार दाखल करण्याबाबत अडचण आल्याचे संबंधित महिलेने सांगितले.



