Theft | नगर : अहिल्यानगरच्या सावेडी उपनगरातील रिलायन्स मार्ट बाजारच्या सर्व्हर रूमची खिडकी तोडून कॅशरूममधील तिजोरी फोडत चार लाख ६६ हजार ३९० रुपयांची रोकड चोरून ( Theft ) नेणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज (ता. १३) अटक केली. या आरोपींकडून चोरीच्या रकमेपैकी ४ लाख ४४ हजार रुपये, तसेच गुन्ह्यात वापरलेली कार व दुचाकी असा एकूण ८ लाख २४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. विशाल अंशाबापू चेमटे (वय ३२, रा. मनोनिला नगर, बोल्हेगाव) व सुधीर दिनकर घोडके (वय ३९, रा. मातोश्री अपार्टमेंट, पवननगर, भिस्तबाग, सावेडी) असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
हे वाचा – पालकांनी मुलांना मैदानाकडे वळवून पुढची पिढी घडविण्यासाठी प्रयत्न करावेत : आमदार संग्राम जगताप
तिजोरी फोडली ( Theft )
सावेडी येथील रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये ९ नोव्हेंबर २०२६ रोजी ही घरफोडी झाली होती. अज्ञात चोरट्यांनी सर्व्हर रूमच्या खिडकीचे गज कापून काच फोडली. त्यानंतर कॅशरूममध्ये प्रवेश करून तिजोरी फोडली आणि त्यातील ४ लाख ६६ हजार ३९० रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दुकानात चोरी ( Theft )
या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्या नेतृत्वाखाली पथक नियुक्त केले. पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास सुरू केला.तपासा दरम्यान हा गुन्हा विशाल अंशाबापू चेमटे (वय ३२, रा. मनोनिला नगर, बोल्हेगाव) आणि सुधीर दिनकर घोडके (वय ३९, रा. मातोश्री अपार्टमेंट, पवननगर, भिस्तबाग, सावेडी) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने दोघांना अहिल्यानगर शहरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता, विशाल चेमटे हा दोन वर्षांपूर्वी रिलायन्स स्मार्ट बाजारमध्ये कामाला होता. त्यामुळे दुकानातील जमा होणारी रोकड कुठे ठेवली जाते, याची त्याला माहिती होती. याच माहितीचा फायदा घेत दोघांनी रेनॉल्ट क्विड कार आणि यामाहा दुचाकीचा वापर करून दुकानात चोरी केल्याची माहिती तपासात समोर आली.
पोलिसांनी आरोपींकडून ४ लाख ४४ हजार रुपये रोख, ३ लाख रुपये किमतीची कार आणि ८० हजार रुपये किमतीची यामाहा दुचाकी, असा एकूण ८ लाख २४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दोन्ही आरोपींना जप्त मुद्देमालासह पुढील तपासासाठी तोफखाना पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि पोलीस अंमलदार संदीप पवार, शाहीद शेख, सागर ससाणे, बाळासाहेब गुंजाळ, फुरकान शेख व प्रशांत राठोड यांच्या पथकाने केली.



