Ajit Pawar : नगर : उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार (Ajit Pawar) यांच्या कार्यकर्तृत्वाचा पूर्ण राज्यावर ठसा उमटला आहे. त्यांच्या निधनाच्या धक्यातून अजूनही राज्य सावरलेला नाहीये. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला कामाचा ठसा उमटवत उत्कृष्ट काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावरही त्यांच्या कामाचा प्रभाव होता. प्रत्येकाला त्यांनी सहकार्यच केले. स्व.अजितदादांनी मांडलेल्या चांदा ते बांधा या संकल्पनेतून त्यांची पूर्ण राज्यात (State) वेगळी ओळख निर्माण झाली.
हे देखील वाचा: बैठकीमध्ये नेमकं ठरलं काय होतं?, अजित पवार सत्ता सोडणार की, शरद पवार भाजपसोबत जाणार?
राधाकृष्ण विखे यांनी स्व.अजितदादांना वाहिली श्रद्धांजली
आपल्या नगर जिल्ह्यावरही त्यांची विशेष मेहेर नजर होती. अशा कर्तृत्व संपन्न, नि:स्वार्थपणे मैत्री जपणारा, सुख दुखांच्या प्रसंगांना सर्वाना बरोबर घेणारा नेता आज आपल्यातून गेला आहे, अशा भावना जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी व्यक्त करत स्व.अजितदादांना श्रद्धांजली वाहिली. राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री स्व.अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी (ता.२) सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात करण्यात आले होते. नगर शहरासह जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील व्यक्तींनी या शोकसभेस उपस्थिती लावून स्व.अजितदादांच्या स्मृती जाग्या करत भाउक होत भावना व्यक्त केल्या. त्यांच्या निधनाने राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याच्या भावना यावेळी उपस्थित बहुतांशांनी व्यक्त केल्या.
नक्की वाचा : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा
सर्व पक्ष, संघटना व संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित (Ajit Pawar)
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, आमदार काशिनाथ दाते, आमदार हेमंत ओगले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अशुतोष काळे, आमदार किरण लहामटे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष चंद्रशेखर घुले, उपाध्यक्ष माधवराव कानवडे, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) जिल्हाध्यक्ष अशोक सावंत, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ कळमकर, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राजेंद्र फाळके, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी मंत्री अण्णासाहेब मस्के, माजी कुलगुरू सर्जेराव निमसे आदींसह सर्व पक्षांचे पदाधिकारी व जिल्ह्यातून आलेले विविध पक्ष, संघटना व संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री विखे म्हणाले, राज्यात जनतेच्या मनातील सरकार आल्यावर झालेल्या राजकीय घडामोडींनंतर अजितदादांनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेत महायुतीत सहभागी झाले. कौटुंबिक विषयाबाबत त्यांना मोठी किंमत मोजावी लागली पण त्यांनी परिणामांचा विचार केला नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पत्नीच्या पराभवानंतरही ते खचले नाहीत. तर नव्या हिंमतीने उभे राहून विधानसभा निवडणुकीत आपल्या पक्षाची वेगळी प्रतिमा त्यांनी राज्यात निर्माण केली. आमच्यात पुष्कळशा कटुता व संघर्ष राहिला आहे. पण एकदा मैत्री जमली की सर्व काही होते. केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात त्यांनी आमच्या परिवारा बाबत कायम स्मरणात राहील अशी भूमिका त्यांनी मांडली.
बाळासाहेब थोरात म्हणाले, अवघा महाराष्ट्र नाहीतर देश स्व. अजित पवार यांच्या निधनाने हळहळला आहे. अजितदादांच्या निधनाच्या दिवशी मी उत्तराखंडात होतो तेथेही त्यांची चर्चा होती. सहकार क्षेत्रात त्यांचा गाढा अभ्यास होता, राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांची त्यांना इत्तमभूत माहिती असे. एखाद्या कारखान्यात खट वाजले तरी त्यांना कळे. हीच स्थिती सर्व जिल्हा बँका व बाजार समिती बाबत होती. माझा व त्यांचा वेगळा पक्ष असला तरी कायम आम्ही बरोबर राहिलो. त्यांनी जेव्हा जेव्हा कटू निर्णय घेतले तेव्हा तेव्हा त्यांनी जनतेच्या हितालाच प्राधान्य दिले व ते ठामपणे बोलून दाखवले. असा स्पष्टोक्ता, निर्णयक्षम व अष्टपैलू असलेले अजित पवार यांच्यासारखा नेतृत्व तयार होण्यास वर्षानुवर्षाची प्रक्रिया लागते.
आमदार मोनिका राजळे म्हणाल्या, शेवगाव पाथर्डी मतदारसंघासाठी अजितदादा यांनी कायम मोठे सहकार्य करत विकासासाठी मार्गदर्शन केले. तसेच प्रत्येक कार्यकर्त्याला बळ दिले. मी जिल्हा परिषदेची उपाध्यक्ष असतानाही त्यांनी मला मोठे सहकार्य केले आहे. न होणारे कामेही त्यांनी सांगितल्यावर तात्काळ होत असे. त्यांचा वक्तशीरपणा, संकट काळात धावून जाणे, स्वच्छता हे गुण शिकण्यासारखे आहेत. गोरगरिबांच्या तारणहार आज त्यांच्या रूपाने गेला आहे.
आमदार काशिनाथ दाते म्हणाले, विकास कामांमध्ये कधीही राजकारण न आणणारे व्यक्तिमत्व अजितदादा होते. माझ्यासारख्या अनेक सामान्य कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी स्वतःहून मला उमेदवारी दिली व निवडून आणले. तसेच महानगर बँकेला सहकार्य केले.
आमदार आशुतोष काळे म्हणाले, कोपरगाव तालुक्याच्या विकास कामांसाठी भरपूर निधी देत त्यांनी विकासात मोठे सहकार्य केले. कायम मार्गदर्शन व योग्य सल्ला त्यांनी मला दिला.
आमदार हेमंत ओगले म्हणाले, माझ्यासारख्या नवख्या आमदारांना त्यांची वागणूक व व्यक्तीमत्व हे खूप प्रभावित करणारे होते. ते खऱ्या अर्थाने सर्वांचे दादा होते.
आमदार विठ्ठल लंघे म्हणाले, राज्यात सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प मांडून त्यांनी वेगाने विक्रम केला आहे. त्यांच्याकडे काम घेऊन गेल्यावर त्यांनी तात्काळ स्पष्टपणे निर्णय घेत मार्गी लावली.
यावेळी अशोक सावंत, शशिकांत गाडे, सचिन गुजर, भानुदास मुरकुटे, दादा कळमकर, नरेंद्र घुले, राजेंद्र फाळके, अण्णासाहेब मस्के, माधवराव कानवडे आदींनी स्वर्गीय अजितदादा पवारांच्या स्मृतीस उजाळा दिला.
शेवटी आमदार संग्राम जगताप यांनी कृतज्ञता व्यक्त केली व पसायदानाने शोकसभेची सांगता झाली.



