Encroachment : कोपरगाव: शहरात नगरपालिका (Kopargaon Municipality) प्रशासनाच्या वतीने आज मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणधारकांविरोधात (Encroachment) अचानक कारवाई (Action) करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली. कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात झाल्याने अतिक्रमणधारकांची मोठी धावपळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नक्की वाचा : शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या; अन्यथा आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी दिला इशारा
अचानक कारवाई सुरू केल्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये गोंधळ
जिल्हाधिकारी यांच्या कोपरगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आल्याची माहिती मिळत असून, त्यामुळे प्रशासनाने तत्काळ हालचाली करत मुख्य रस्ते मोकळे करण्यावर भर दिला. या कारवाईदरम्यान काही ठिकाणी हातगाड्या, टपऱ्या तसेच अनधिकृत फलक हटविण्यात आले. नगरपालिकेने अचानक मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्यामुळे व्यापारी व अतिक्रमणधारकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, सत्ताधारी पक्षातील काही नगरसेवकांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, वरिष्ठांशी चर्चा करून घ्या, असे सांगण्यात आले. मात्र, त्यानंतरही ही मोहीम सुरूच ठेवण्यात आली.
हे देखील वाचा: बैठकीमध्ये नेमकं ठरलं काय होतं?, अजित पवार सत्ता सोडणार की, शरद पवार भाजपसोबत जाणार?
वारंवार अतिक्रमण होत असल्यामुळे कारवाईवर प्रश्नचिन्ह (Encroachment)
काही महिन्यांपूर्वीही कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबविली होती. मात्र, त्यानंतर पुन्हा मुख्य रस्त्यांवर अतिक्रमणे वाढल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारल्याचे सांगितले जात आहे. अतिक्रमणधारकांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता अचानक कारवाई केल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, प्रशासनाकडून यापूर्वीच संबंधितांना सूचना देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोपरगाव शहरात यापूर्वीही अनेक वेळा अतिक्रमण हटाव मोहिमा राबविण्यात आल्या आहेत. मात्र, या मोहिमा काही दिवसांपुरत्याच मर्यादित राहतात. त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणे उभी राहत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे. या कारवाईमुळे आगामी काळात अतिक्रमणाच्या मुद्द्यावर राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



