Shirdi News: शिर्डीचे साईबाबा (Shirdi Saibaba)हे आपलंच नव्हे तर जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान आहे. मात्र मागील काही दिवसांपासून शिर्डीतील श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील जगप्रसिद्ध मूर्तीची झीज (Erosion of the idol) होत असल्याच्या चर्चा रंगत होत्या. या पार्श्वभूमीवर मूर्तीच्या संवर्धनासाठी आणि मूर्तीची सध्याची परिस्थिती तपासण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने आपला सविस्तर अहवाल (Expert committee report) सादर केला आहे. साईबाबांची मूर्ती पूर्णपणे सुरक्षित असून तिला कोणताही धोका नाही,असं या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.आता या अहवालात नेमकं काय सांगितलं ते जाणून घेऊ…
नक्की वाचा: सौंदाळा ग्रामपंचायतचा ऐतिहासिक निर्णय;दररोज गावासाठी राष्ट्रगीत लागणार
छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील तज्ज्ञ समितीने केली तपासणी (Shirdi News)
मुंबईच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील तज्ज्ञ समितीने शिर्डीत येऊन मूर्तीची अत्यंत सूक्ष्म आणि तांत्रिक पाहणी केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालात महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. शिर्डीत साईबाबांची ही भव्य मूर्ती उच्च दर्जाच्या इटालियन मार्बल मध्ये साकारलेली आहे. हा दगड अत्यंत कठीण आणि टिकाऊ असल्याने नैसर्गिकरीत्या त्याची झीज होण्याची प्रक्रिया अत्यंत संथ असते. त्यामुळे ही मूर्ती पुढील अनेक दशके तशीच राहील, असे त्यांनी या अहवालात नमूद केले आहे.

मूर्तीची स्थिती ही त्कृष्ट श्रेणीत मोडते. केवळ अफवांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक निकषांवर मूर्ती सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मूर्तीवर काही ठिकाणी ज्या अतिसूक्ष्म खुणा दिसत आहेत, त्या दगडाच्या नैसर्गिक संरचनेचा भाग असू शकतात, मात्र त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असेही तज्ज्ञ समितीने म्हटले आहे. तसेच या मूर्तीचे पावित्र्य आणि चकाकी कायम राखण्यासाठी तज्ज्ञांनी साईबाबा संस्थानला ५ महत्त्वाचे बदल सुचवले आहेत.
अवश्य वाचा: मोठी बातमी!पंकजा मुंडेंच्या हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड
तज्ज्ञ समितीने सुचविलेले ५ महत्त्वाचे बदल कोणते? (Shirdi News)
१. केमिकल विरहित उपचार: दररोज पहाटे होणाऱ्या मंगलस्नानावेळी कोणत्याही रासायनिक द्रव्याचा किंवा साबणयुक्त पदार्थांचा वापर पूर्णपणे बंद करावा.
२. नैसर्गिक अर्पण: मूर्तीला वाहिलं जाणारं गंध, अत्तर आणि गुलाब जल अर्पण करताना ते पूर्णपणे नैसर्गिक असल्याची खात्री करावी. बाजारू उत्पादनांमधील ‘ऍसिडिक’ घटक मार्बलच्या थराला हानी पोहोचवू शकतात.
३.शुद्ध पाण्याचा वापर: मूर्तीच्या स्नानासाठी वापरले जाणारे पाणी ‘सॉफ्ट वॉटर’ असावे. पाण्यातील क्षारांचे प्रमाण जास्त असल्यास मूर्तीच्या रंध्रांमध्ये क्षार साचून मूर्ती निस्तेज दिसू शकते.
४. सतत देखरेख: मूर्तीवर असलेल्या नैसर्गिक रेषा किंवा खुणांमध्ये काही बदल होतोय का, याचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
५. थंड प्रकाश व्यवस्था: साईबाबांची मूर्ती ज्या ठिकाणी आहे. त्या गाभाऱ्यातील प्रकाश व्यवस्था ही उष्णता निर्माण करणारी नसावी. ‘कोल्ड एलईडी’ दिव्यांचा वापर करून मूर्तीवर थेट उष्णता पडणार नाही, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.
आता त्या समितीने दिलेला अहवाल हा केवळ दिलासा देणारा नसून तो भविष्यासाठी सतर्क करणाराही आहे. श्री साईबाबा संस्थानने या अहवालातील प्रत्येक तांत्रिक सूचनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार,आता दररोजच्या पूजा-विधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या द्रव्यांची गुणवत्ता तपासली जाणार असून, मूर्तीवर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी विशेष पथक तैनात केले जाण्याची शक्यता आहे.



