Ajit Pawar : नगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) खंबीर नेतृत्व अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानंतर पक्षाच्या राजकीय भविष्याबाबतचा सस्पेन्स अधिकच गडद झाला आहे. दोन्ही राष्ट्रवादींचे एकसंघ होणार की अजितदादांचा गट थेट भाजपमध्ये (BJP) विलीन होणार, या प्रश्नावरून राजकीय धुरळा उडाला आहे. विलीनीकरणाच्या चर्चांना सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी जरी पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला असला, तरी पडद्यामागे घडणाऱ्या हालचालींमुळे संभ्रमाचे वातावरण कायम आहे. १२ फेब्रुवारीची तारीख या संदर्भात महत्त्वाची मानली जात असतानाच, तटकरे आणि पटेल यांच्या भूमिकेमुळे पक्षात दोन उभे गट पडल्याचे चित्र दिसत आहे.
नक्की वाचा: अहिल्यानगर तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींवर प्रशासकराज!
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य करण्यास सुरुवात
शरद पवार गटाने या संघर्षात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसत असून सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली असल्याचे बोलले जात आहे. हे दोन्ही नेते स्वतःचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी अजितदादांच्या नावाचा गैरवापर करत असून पक्षाला भाजपच्या हवाली करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप ‘उबाठा’ आणि शरद पवार गटाकडून केला जात आहे. सुरु असलेल्या विरोधकांकडील आरोप या अनुषंगाने प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदारांशी वैयक्तिक चर्चा करून त्यांची मते जाणून घेतल्याच्या चर्चा रंगत आहे. तर सदर चर्चा पक्षाला वाचवण्यासाठी आहेत, की विलीनीकरणाचा मार्ग सुकर करण्यासाठी की काय, आशा प्रकारच्या शंका उपस्थित केली जात आहे.
अवश्य वाचा : त्रिभाषा धोरण समितीचा अहवाल राज्य सरकारकडे सादर; आता मंत्रिमंडळात होणार मोठा निर्णय?
रोहित पवार यांच्या पत्रकार परिषदेकडे लक्ष (Ajit Pawar)
आमदार रोहित पवार यांच्या होणाऱ्या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. रोहित पवार या वादात कोणते नवे पुरावे किंवा दावे सादर करतात, यावर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील पुढील संघर्षाची धार अवलंबून असेल. एका बाजूला साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकीचे निकाल प्रस्थापितांना धक्का देणारे ठरले असतानाच, दुसऱ्या बाजूला राज्याच्या राजधानीत सुरू असलेल्या या ‘पॉवर गेम’मुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अस्तित्व धोक्यात आले आहे की हा एखाद्या मोठ्या राजकीय भूकंपापूर्वीचा शांत काळ आहे, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.



