Shri Guru Tegh Bahadurji : नगर : इतिहासाच्या पानांवर धर्म, श्रद्धा व सत्यासाठी स्वतःचा जीव अर्पण करणाऱ्यांची गाथा सुवर्णाक्षरांनी कोरलेली असते. अशाच तेजस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे शीख धर्माचे नववे गुरू, श्री गुरू तेग बहादूर साहिबजी (Shri Guru Tegh Bahadurji) होत. संपूर्ण जग त्यांना ‘हिंद-दी-चादर’ (Hind Di Chadar) म्हणजेच भारतभूमीचे संरक्षक कवच म्हणून ओळखते. त्यांच्या शहिदीला (बलिदानाला) यंदा ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने त्यांच्या विचारांचा जागर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने (Government of Maharashtra) राज्यभर विशेष प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
नक्की वाचा : घरकुल योजनेत अनियमिततेचा आरोप; प्रशासनाने चौकशी करण्याचे दिले आश्वासन
‘तेग बहादूर’ म्हणजेच शौर्य, नम्रता यांचा सुरेख संगम
श्री गुरू तेग बहादूरजींचा जन्म १ एप्रिल १६२१ रोजी अमृतसर येथे झाला. शीख धर्माचे सहावे गुरू हरगोबिंद साहेब हे त्यांचे वडील. बालपणी त्यांचे नाव ‘त्यागमल’ होते. मात्र, युद्धभूमीवर त्यांनी गाजवलेल्या अफाट शौर्यामुळे वडिलांनी त्यांना ‘तेग बहादूर’ म्हणजेच ‘तलवारीसारखा धैर्यवान’ असे सार्थ नाव दिले. त्यांच्या अंगी बालपणापासूनच शौर्य, नम्रता व आध्यात्मिक चिंतन यांचा सुरेख संगम होता. १६६४ मध्ये ते शीख धर्माचे नववे गुरू बनले. त्यांनी स्थापन केलेले ‘आनंदपूर साहिब’ हे आजही शीख धर्माचे महत्त्वाचे केंद्रस्थान आहे.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://whatsapp.com/channel/0029VbCCtgJ4IBhMHvG2cG3D
हिंदुस्थानच्या धार्मिक स्वातंत्र्याचे केले रक्षण (Shri Guru Tegh Bahadurji)
सतरावे शतक हे परकीय आक्रमणांचे आणि संस्कृतीवर होणाऱ्या हल्ल्यांचे शतक होते. अशा वेळी गुरू तेग बहादूरजींनी धर्माचा खरा अर्थ जगाला समजावून सांगितला. ‘धर्म म्हणजे दुसऱ्यावर सक्ती करणे नव्हे, तर दुसऱ्याच्या श्रद्धेचा सन्मान करणे होय,’ हा विचार त्यांनी मांडला. दिल्लीतील चांदणी चौकाजवळ त्यांना कैद करून धर्मांतराची सक्ती करण्यात आली. पण त्यांनी आपल्या तत्त्वांशी कोणतीही तडजोड केली नाही. इतरांच्या धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतःचे शीश अर्पण केले आणि १६७५ मध्ये हसत हसत हौतात्म्य पत्करले. ज्याप्रमाणे ‘चादर’ शरीराचे रक्षण करते आणि मायेची ऊब देते, त्याचप्रमाणे गुरूजींनी संपूर्ण हिंदुस्थानच्या धार्मिक स्वातंत्र्याचे रक्षण केले. म्हणूनच त्यांना ‘हिंद-दी-चादर’ या उपाधीने गौरविले जाते. त्यांचे बलिदान केवळ एका धर्मापुरते मर्यादित नव्हते, तर ते संपूर्ण मानवतेच्या मानवाधिकारांचे रक्षण करणारे होते.
गुरू तेग बहादूरजींनी शिकवले की, धैर्य केवळ तलवारीत नसते, तर ते सत्यात असते. ‘कोणाला घाबरवू नका आणि कोणाचे भय बाळगू नका’ हा त्यांचा संदेश आजही तितकाच मार्गदर्शक आहे. त्यांनी आपल्या रचनेत ‘न को बैरी, न ही बेगाना, सगल संग हम कोदर्शन बन आई’ असा सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. याचा अर्थ, ‘माझ्यासाठी कोणीही शत्रू नाही किंवा परका नाही, कारण सर्वांमध्ये एकच ईश्वर वसलेला आहे.’ श्री गुरू ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट असलेले त्यांचे ५७ शब्द आणि ५७ सलोक मानवी जीवनाला सत्य आणि संयमाचा मार्ग दाखवतात. धर्म ही माणसांना विभागणारी भिंत नसून, तो जोडणारा पूल आहे, हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले.
गुरू तेग बहादूरजींच्या या संघर्षमयी प्रवासात केवळ शीख अनुयायीच नव्हे, तर अनेक समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. विशेषतः लबाना व गोर बंजारा समाजाचे योगदान यात मोलाचे आहे. व्यापारी बाबा माखनशहा लबाना यांनी गुरूजींना ओळखून ‘गुरू मिले सच्चा!’ अशी गर्जना केली होती. आजही राजस्थान, महाराष्ट्र, पंजाब, कर्नाटक व तेलंगणासारख्या राज्यांत हा समाज गुरूजींची भक्ती आणि सेवेची परंपरा जिवंत ठेवून आहे.
गुरू तेग बहादूर साहिबजी यांच्या ३५० व्या शहिदी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासन ‘हिंद-दी-चादर’ हा उपक्रम तीन टप्प्यांत राबवित आहे. याचा तिसरा टप्पा २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी नवी मुंबईतील खारघर येथे संपन्न होत आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या उपक्रमाचे संकेतस्थळ आणि एका विशेष गीताचे लोकार्पण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी परंपरेने आणि संतांच्या शिकवणीने घडलेल्या महाराष्ट्राच्या भूमीत हा स्मरणोत्सव होणे, हे विविधतेतील एकतेचे उत्तम उदाहरण आहे. या निमित्ताने शीख, सिकलीगर, बंजारा, लबाना, सिंधी, मोहयाल, वाल्मीकी, उदासी आणि भगत नामदेव संप्रदाय (वारकरी) अशा विविध समुदायांना एकाच व्यासपीठावर आणले जात आहे.
गुरू तेग बहादूर साहिबजींचा ‘शहीद दिवस’ हा केवळ स्मृतीचा दिवस नसून, अन्यायाविरुद्ध लढण्याचे धैर्य देणारा आणि ‘चढदी कला’ म्हणजेच अखंड सकारात्मकतेचा उत्सव आहे. आधुनिक काळातही मानवी हक्क आणि धार्मिक स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी त्यांचे बलिदान एका दीपस्तंभासारखे मार्गदर्शन करत आहे. जोपर्यंत या भूमीवर मानवतेवर प्रेम करणारी माणसे आहेत, तोपर्यंत ‘हिंद-दी-चादर’ ही अमर गाथा प्रत्येकाच्या अंतःकरणात तेवत राहील !



