Mahavitaran : नगर : शासनाच्या सौर ऊर्जा (Solar Energy) योजनेवर विश्वास ठेवून लाखो रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांनाच अवाजवी वीजबिलांचा (Electricity Bills) फटका बसत असल्याची धक्कादायक प्रकरणे जिल्ह्यात समोर आली आहेत. सौर प्रकल्प बसविल्यानंतर वीजबिलात बचत होण्याऐवजी उलट लाखोंची थकबाकी दाखवून वीजपुरवठा खंडित करण्याचे इशारे दिले जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी महावितरणच्या (Mahavitaran) ग्रामीण उपविभागीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करून संबंधित प्रकरणांची तातडीने तांत्रिक चौकशी करण्याची मागणी केली.
नककी वाचा : राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता : सुजय विखे पाटील
अवाजवी बिल पाठवण्यात आल्याचा आरोप
अहिल्यानगर तालुक्यातील टाकळी काझी येथील शेतकरी सचिन म्हस्के यांनी महावितरणची विधिवत परवानगी घेऊन ३ किलोवॅट क्षमतेचा सौर प्रकल्प उभारला. सौर ऊर्जेमुळे वीजबिलात मोठी घट होण्याची अपेक्षा असताना, त्यांना उलट हजारोंची थकबाकी दाखवून अवाजवी बिल पाठवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. थकबाकी न भरल्यास वीजपुरवठा खंडित करण्याचा इशाराही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे देवगाव येथील शेतकरी गुलाब मोहन वामन यांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ३ किलोवॅट सौर प्रकल्प बसविला. मात्र त्यांना तब्बल ४ लाख ३२ हजार रुपयांचे बिल पाठवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
अवश्य वाचा : दुबईत अडकलेल्या नागरिकांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्याकडून विशेष विमानाची व्यवस्था
नेट-मीटरिंगमध्ये त्रुटी (Mahavitaran)
शेतकऱ्यांच्या मते, नेट-मीटरिंगची योग्य वजावट न करणे, मीटर रीडिंगची अचूक तपासणी न करणे आणि प्रणालीतील त्रुटी वेळेत दुरुस्त न करणे या बाबींमध्ये गंभीर निष्काळजीपणा झाला आहे. सौर योजनेचा मुख्य उद्देश वीजबिलात बचत करणे हा असताना, उलट प्रचंड थकबाकी दाखविणे हे नियमबाह्य व योजनेच्या उद्देशालाच हरताळ फासणारे असल्याचा आरोप करण्यात आला.
📣 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
🪀 https://chat.whatsapp.com/D9yG5gFstDCESNfitc3gt9
शेतकऱ्यांनी उपस्थित केले प्रश्न
सौर प्रकल्प बसवल्यानंतरही लाखो रुपयांची बिले कशी आकारली जात आहेत? नेट-मीटरिंगची अंमलबजावणी योग्य पद्धतीने का होत नाही? चुकीचे बिल देऊन वीज पुरवठा खंडित करण्याचा अधिकार कोणत्या नियमांनुसार वापरला जात आहे? सौर योजनेवर विश्वास ठेवणाऱ्या शेतकऱ्यांवर आर्थिक दबाव टाकण्याचा हा प्रकार आहे का? या घटनांमुळे जिल्ह्यातील सौर प्रकल्प धारक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आंदोलनाचा इशारा
“सौर प्रकल्प बसवणाऱ्या शेतकऱ्यांवर लाखोंची बिले लादून त्यांना आर्थिक संकटात ढकलण्याचा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही. ही प्रकरणे तातडीने मार्गी लावली नाहीत तर तीव्र आंदोलन छेडले जाईल,” असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे.



