Savitribai Phule Pune University : पारनेर : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) वतीने ‘वंदे मातरम्’ या राष्ट्रीय गीताच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित विशेष उपक्रमांतर्गत ‘वंदे मातरम् रथाचे पारनेर येथील न्यू आर्टस् कॉमर्स अॕण्ड सायन्स महाविद्यालयात (New Arts, Commerce and Science College) आगमन झाले. विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी ‘वंदे मातरम्’ (Vande Mataram) आणि ‘भारत माता की जय’च्या जयघोषात रथाचे स्वागत केले. या जयघोषाने संपूर्ण महाविद्यालय परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला. यानिमित्त महाविद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना ‘वंदे मातरम्’ या गीताचा जाज्वल्य इतिहास आणि त्याचे महत्त्व समजावून सांगितले.
नक्की वाचा : रयत सेवक बँकेच्या चेअरमनपदी प्रशांत खामकर
या गीताचा प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये सर्वोच्च सन्मान
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांनी स्वातंत्र्यलढ्यातील या गीताचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “ब्रिटिश सत्तेच्या जुलमी राजवटीविरुद्ध लढताना भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य भारतीयांनी आंदोलनं केली, मोर्चे काढले आणि सत्याग्रह केले. अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, हौतात्म्य पत्करले. फासावर जातानाही या क्रांतिकारकांच्या ओठांवर ‘वंदे मातरम्’ हेच शब्द होते. या एका गीताने संपूर्ण देशाला गुलामगिरीविरुद्ध लढण्याची अफाट प्रेरणा दिली. त्यामुळेच आजही राष्ट्रगीताप्रमाणेच ‘वंदे मातरम्’ या गीताचा प्रत्येक भारतीयाच्या हृदयामध्ये सर्वोच्च सन्मान आहे.”
अवश्य वाचा : ‘बैटल ऑफ गलवान’चा नवा अवतार; सलमान खानचा चित्रपट आता ‘मातृभूमी’ नावाने येणार
अंधकारमय परिस्थितीत हे गीत आशेचा किरण (Savitribai Phule Pune University)
या गीताचा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी प्रवास उलगडताना राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. महेश आहेर म्हणाले, “१८७० मध्ये बंकिमचंद्र चटर्जी यांनी ‘वंदे मातरम्’ या गीताची रचना केली आणि पुढे आपल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीमध्ये त्याचा समावेश केला. त्या काळात ब्रिटिशांकडून बंगालमध्ये राष्ट्रभक्तीची भावना कठोरपणे दडपली जात होती. अशा अंधकारमय परिस्थितीत हे गीत आशेचा किरण बनले. लाल-बाल-पाल, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू अशा अनेक नेत्यांनी यातून ऊर्जा घेतली. एवढेच नव्हे तर, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ‘वंदे मातरम्’लाच स्वातंत्र्यलढ्यातीलतील घोषवाक्य मानले होते. १८९६ मध्ये कोलकत्ता येथे आयोजित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात या गीताचे सार्वजनिकरित्या प्रथम सादरीकरण झाले आणि विशेष म्हणजे या गीताला रवींद्रनाथ टागोर यांनी स्वरबद्ध केले होते.”
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
विविध विभागातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित
या गीतातील भावार्थावर प्रकाश टाकताना विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. रवींद्र देशमुख म्हणाले, ‘वंदे मातरम्’ हे केवळ काही शब्दांचे गीत नसून, तो भारतीय स्वातंत्र्याचा आणि अस्मितेचा आत्मा आहे. या गीतामध्ये आपल्या भारत मातेचे अथांग सौंदर्य, निसर्गसंपन्नता आणि तिचे वात्सल्यपूर्ण मातृप्रेम यांचे अतिशय विलोभनीय वर्णन केले आहे. हे गीत ऐकताना आजही अंगावर काटा येतो. हे गीत येणाऱ्या प्रत्येक पिढीला देशभक्ती, राष्ट्रीय एकता आणि मातृभूमीवरील अढळ प्रेमाची प्रेरणा देत राहील.”याप्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध विभागातील प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. हनुमंत गायकवाड यांनी कार्यक्रमाचे आभार मानले.



