Rahuri News:अग्नितांडवातून आजीने वाचविले नातींचे प्राण;प्रकरण नेमकं काय? 

0
Rahuri News:अग्नितांडवातून आजीने वाचविले नातींचे प्राण;प्रकरण नेमकं काय? 
Rahuri News:अग्नितांडवातून आजीने वाचविले नातींचे प्राण;प्रकरण नेमकं काय? 

नगर: सगळीकडे धुराचे लोट,आगीच्या भीषण ज्वाळा (Fierce Flames of Fire) आणि मृत्यूचा समोर उभा असलेला हाहाकार! क्षणात होत्याचं नव्हतं होईल असं वाटत असतानाच,नियतीलाही आव्हान देणारं एक मोठं धाडस एका आजीने केलं आहे. काळजाचा थरकाप उडवणाऱ्या अग्नितांडवातून आजीने आपल्या नातींना मृत्यूच्या जबड्यातून बाहेर खेचून आणलं. ही घटना घडलीय राहुरीमध्ये (Rahuri News). नेमकं प्रकरण काय पाहू…

नक्की वाचा: बारामती पोटनिवडणूक लढवून जिंकून दाखवतो,लक्ष्मण हाकेंचा निर्धार

नेमकं घडलं काय ? (Rahuri News)

राहुरी शहरातील करपे इस्टेट परिसरात लागलेल्या भीषण आगीत एका आजीने दाखवलेल्या मोठ्या धाडसामुळे दोन चिमुकल्यांचे प्राण वाचलेत.स्वतःचा जीव धोक्यात घालून आगीत झेप घेतलेल्या मनिषा कोरडे या आजीबाई या घटनेत गंभीररीत्या भाजून जखमी झाल्या आहेत. मल्हारवाडी रोड परिसरातील करपे इस्टेट येथे नितीन कोरडे यांचे निवासस्थान आहे. मंगळवारी १७ मार्चला दुपारी २ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरात अचानक आग लागली. घरात यावेळी दोन लहान मुली अडकल्या होत्या. योगायोगाने घरात इतर कोणीही नव्हते. याचवेळी बाहेर गेलेल्या मनिषा कोरडे या घरी परतल्या, मात्र यावेळी त्यांना घरातून धुराचे लोट निघताना दिसले. आत अडकलेल्या नातींच्या आर्त किंकाळ्या ऐकताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता आगीत धाव घेतली. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी दोन्ही मुलींना या भीषण अग्नितांडवातून सुखरूप बाहेर काढले, मात्र या धाडसी प्रयत्नात त्या स्वतः गंभीररीत्या भाजल्या. 

अवश्य वाचा: ॲसिड हल्ला झाल्यास त्वरित काय उपाय करावेत ? वाचा सविस्तर…

मनिषा कोरडे रुग्णालयात दाखल (Rahuri News)

या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत मनिषा कोरडे यांना रुग्णालयात दाखल केले. स्थानिकांनी एकत्रित प्रयत्नांतून पाणी टाकून ही आग आटोक्यात आणली. या आगीत कोरडे कुटुंबीयांचे घरातील सर्व गृहोपयोगी साहित्य जळून खाक झालं असून त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी टळली. ही आग लागण्याचे नेमके कारण अजून समजू शकलेले नाही. या दुर्घटनेची माहिती मिळताच माजी नगरसेवक सूर्यकांत भुजाडी, दिलीप गोसावी यांच्यासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य केले. या दुर्घटनेचा पंचनामा करून, कोरडे कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. मात्र या घटनेने आगीच्या ज्वाळांपेक्षाही मायेची ऊब मोठी असते, हेच पुन्हा एकदा सिद्ध केलंय.