Hailstorm : पारनेर : ढवळपुरी परिसरात आज अचानक आलेल्या अवकाळी पावसाने (Unseasonal Rain) आणि भीषण गारपिटीने (Hailstorm) थैमान घातले. निसर्गाच्या या कोपामुळे ढवळपुरीतील (Dhavalpuri) शेतकरी पूर्णपणे कोलमडला असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
नक्की वाचा : वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
बळीराजाच्या डोळ्यात पाणी
या गारपिटीचा सर्वाधिक फटका कलिंगड उत्पादकांना बसला आहे. काढणीसाठी तयार असलेली कलिंगडे गारांच्या मारामुळे शेतातच फुटून खराब झाली आहेत. तसेच, नगदी पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कांद्याचे आणि गव्हाचे पीक आडवे झाले आहे. गारांच्या थरामुळे शेतीचे पांढरे पडलेले स्वरूप पाहून बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पशुधनाच्या खाद्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती (Hailstorm)
केवळ पिकेच नव्हे, तर जनावरांच्या चाऱ्याचेही मोठे नुकसान झाले आहे. चारा भिजल्याने आणि कुजल्याने पुढील काळात पशुधनाच्या खाद्याचा प्रश्न गंभीर होण्याची भीती निर्माण झाली आहे “वर्षभर घाम गाळून पीक उभे केले, पण एका तासाच्या पावसाने सर्व काही संपवले. आता जगायचे कसे?” अशी आर्त हाक स्थानिक शेतकऱ्यांनी दिली आहे.
शासनाने या घटनेचा त्वरित पंचनामा करून ढवळपुरीतील बाधितांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



