Dr. Sujay Vikhe Patil | नगर : राहुरी विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. भाजपचे नेते तथा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या आकस्मित निधनानंतर रिक्त झालेल्या या जागेवर पोटनिवडणूक होत आहे. भाजपकडून शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांचे नाव चर्चेत आहे. तर माजी मंत्री प्राजक्त तनपुरेही (Prajakt Tanpure) निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे ही निवडणूक रंगात आली आहे. अशातच माजी खासदार तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil) यांनी एक भाकीत केले आहे. हे भाकीत सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कर्डिले व तनपुरे यांच्यात राजकीय संघर्ष
राहुरी विभानसभा मतदारसंघात राहुरी तालुका तसेच अहिल्यानगर व पाथर्डी तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे. या भागात कर्डिले व तनपुरे यांच्यात राजकीय संघर्ष आहे. या मतदारसंघात शिवाजीराव कर्डिले यांना केवळ एक वेळा पराभव स्वीकारावा लागला. २०१९ची ती निवडणूक होती. पहिल्यांदाच निवडणूक लढत असलेल्या प्राजक्त तनपुरे यांनी कर्डिलेंना पराभवाचा धक्का दिला. तनपुरे हे मोठे राजकीय घराणे आहे. प्राजक्त तनपुरे हे माजी खासदार प्रसाद तनपुरे यांचे पुत्र तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचे ते भाचे आहेत. या विजयानंतर त्यांना राज्यमंत्रीपद मिळाले होते.
अवश्य वाचा- वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
निवडणुकांतील चुकांतून मोठा धडा
२०२४च्या विधानसभा निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांना मागील निवडणुकांतील चुकांतून मोठा धडा घेत प्राजक्त तनपुरे यांना पराभवाचा धक्का दिला. या विजयात युवा नेते अक्षय कर्डिले यांचा मोठा हात होता, असे मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले होते. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर या जागेवर अक्षय कर्डिले यांच्या बिनविरोध निवडीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, निवडणूक जाहीर होताच प्राजक्त तनपुरे यांनी निवडणूक लढणार असल्याचे वक्तव्य केल्याने राजकीय चर्चांना वेग आला आहे.
हे वाचा – आश्वासनानंतर लोणी व्यंकनाथ येथील ‘रास्ता रोको’ मागे
मागील महिनाभरापासून प्राजक्त तनपुरे हे भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चांही वाढल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघात भाजपचाच आमदार करण्याचे आदेश स्थानिक नेते व कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यानुसार भाजपने सर्वेक्षण केले आहे.
हे पहा – 68 वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा: दिवस दुसरा, माती गट
या निवडणुकीबाबत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सूचक वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणात सांगितले होते की, राहुरी व बारामती येथील पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न आहे. मात्र, बिनविरोध निवडणूक झाली नाही तर आम्ही निवडणूक लढण्यासाठी तयार आहोत. मी आश्वासित करतो की, राहुरी विधानसभा मतदार संघाचा आमदार हा भाजपचाच असेल, ही काळ्या दगडावरील पांढरी रेष आहे, असे सूचक वक्तव्य डॉ. विखे पाटील यांनी केले.



