
Nilwande Action Committee : राहाता : नगर- नाशिक निळवंडे कृती समिती (Nilwande Action Committee) यांच्या वतीने उर्ध्व प्रवरा (निळवंडे-२) विभागाचे कार्यकारी अभियंता, संगमनेर (घुलेवाडी) यांना विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. यावेळी पाणी आरक्षण (Water Reservation), P.D.N. कामांतील दिरंगाई तसेच उन्हाळी आवर्तनाच्या (Summer Water Rotation) नियोजनाचा प्रश्न ऐरणीवर आणत प्रशासनाकडून तातडीने ठोस निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली.
नक्की वाचा : अॅसिड हल्ला करणाऱ्या आरोपीवर कठोर कारवाई करा : अमोल खताळ
शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामात अडथळे
समितीच्या निवेदनात नमूद करण्यात आले की, लाभक्षेत्रातील P.D.N.ची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहे. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या पिकांमध्ये खोदकाम करून कामे अपूर्ण अवस्थेतच ठेवली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन शेतीकामात अडथळे निर्माण होत असून वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. परिणामी शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे अद्याप पूर्ण झालेले नाहीत, त्यांचे पंचनामे तातडीने पूर्ण करून योग्य मोबदला देण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
अवश्य वाचा- वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
नागरिकांमध्ये तीव्र नाराजी (Nilwande Action Committee)
तसेच, निळवंडे प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील अनेक गावांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत असताना वारंवार निवेदने देऊनही पाणी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबितच राहिल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. उन्हाळा जवळ येत असताना पाणीटंचाई अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तत्काळ पाणी आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा समितीने दिला आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पिकांना पाण्याची नितांत गरज
मागील आवर्तनाच्या आधारे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रब्बी पिकांची लागवड केली आहे. सध्या पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे पुढील उन्हाळी आवर्तनाचे तातडीने नियोजन करून पाणी सोडण्यात यावे, अन्यथा पिकांना फटका बसून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. वरील सर्व प्रश्नांचा प्रशासनाने गांभीर्याने विचार करून तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा निळवंडे कृती समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. या प्रसंगी समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वर्पे, उपाध्यक्ष गंगाधर गमे, उत्तमराव घोरपडे, मच्छिंद्र काळे, सौरभ शेळके, निलेश शेळके आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


