Panchayat Samiti Office : पाथर्डी : पाथर्डी पंचायत समितीचे (Panchayat Samiti Office) वीज बिल थकीत राहिल्याने बुधवारी (ता. २५) वीज वितरण कंपनीने थेट वीजपुरवठा (Power Supply) खंडित केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे पंचायत समितीचा संपूर्ण कारभार ठप्प झाला. प्रशासनाची ढिसाळ व बेफिकीर कार्यपद्धती पुन्हा एकदा समोर आली आहे. पंचायत समितीकडे तब्बल ६५ हजार रुपयांचे वीज बिल (Electricity Bill) थकीत होते. याबाबत वारंवार सूचना देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अखेर वीज वितरण कंपनीने कठोर भूमिका घेत पुरवठा खंडित केला.
नक्की वाचा: धर्मांतर केल्यास अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
दैनंदिन कामकाज विस्कळीत
या घटनेचा सर्वाधिक फटका नागरिकांना बसला. वीजपुरवठा खंडित होताच पंचायत समितीतील दैनंदिन कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले. सध्या बहुतांश प्रशासकीय कामे संगणक प्रणालीवर अवलंबून असल्याने वीज नसल्यामुळे सर्व संगणक, सर्व्हर व ऑनलाईन सेवा बंद पडल्या. जन्म-मृत्यू नोंद, विविध दाखले, विविध योजना अर्ज, शासकीय कागदपत्रांची पडताळणी यांसारखी महत्त्वाची कामे थांबली. नागरिकांना दिवसभर प्रतीक्षा करूनही रिकाम्या हाताने परत जावे लागले.
अवश्य वाचा: आयपीएल २०२६ साठी बीसीसीआयने शेवटच्या क्षणी नियम बदलले, ते कोणते?
अंधारात बसण्याची वेळ (Panchayat Samiti)
याशिवाय पंचायत समितीतील विविध विभागांमधील अंतर्गत कामकाजही थांबले. फाईल्सची देवाणघेवाण, अहवाल सादर करणे, पत्रव्यवहार, ई-मेलद्वारे होणारे संवाद या सर्व प्रक्रियांना ब्रेक लागला. अधिकारी व कर्मचारी यांना अक्षरशः अंधारात बसण्याची वेळ आली. कार्यालयांमध्ये अनेक पंखे, लाईट बंद असल्याने उकाडा व अस्वस्थता निर्माण झाली. या घटनेमुळे प्रशासनातील नियोजनशून्यता उघड झाली. एवढ्या महत्त्वाच्या शासकीय कार्यालयात वीज बिलासारख्या मूलभूत बाबीकडे दुर्लक्ष होणे हे गंभीर मानले जात आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर प्रशासनाला जाग
दरम्यान, वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर प्रशासनाला जाग आली. त्यानंतर तातडीने ६५ हजारांपैकी ३५ हजार रुपये भरण्यात आल्यानंतर सायंकाळी उशिरा वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दिवसभरात झालेल्या कामकाजाच्या नुकसानीची भरपाई कशी करणार हा प्रश्न उपस्थित होत आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांनी पंचायत समितीच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



