Hail:पाथर्डी: तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना सोमवारी सायंकाळी अवकाळी पावसासह गारपिटीचा (Hail) तडाखा बसला. खरवंडी, येळी, बडेवाडी, बोंदरवाडी, पिंपळगव्हाण, जांभळी आदी परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. विशेषतः बडेवाडी शिवारात गारांचा वर्षाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.सायंकाळी सुमारे पाच वाजताच्या सुमारास अचानक आकाशात ढग दाटून आले. वीजांचा कडकडाट (Lightning strike) सुरू झाला आणि जोरदार वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. काही ठिकाणी मुसळधार, तर काही गावांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. या अचानक बदललेल्या वातावरणामुळे शेतकऱ्यांची मोठी धावपळ उडाली.
अवश्य वाचा- श्रीपाद छिंदम यांची पोलीस अधीक्षकांकडे तक्रार; अंगरक्षकाची मागणी
पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान (Hail)
वादळी वारा, पाऊस आणि गारपिटीमुळे गहू, कांदा, हरभरा, मका तसेच आंबा या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः कापणी करून शेतात ठेवलेली पिके पावसात भिजल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. आंबा बागांनाही मोठा फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. वाऱ्याचा वेग इतका तीव्र होता की शेतातील झाडे कोसळतील अशी भीती निर्माण झाली होती. सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ हा पाऊस सुरू होता. खरवंडी कासार परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पेठेत पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले.अवकाळी पावसामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत. बडेवाडी परिसरात झालेल्या गारपिटीमुळे नुकसान अधिक असल्याचे सांगितले जात आहे. अचानक कोसळलेल्या या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना मोठा दणका दिला असून पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.



