Rasta Roko Movement : संगमनेर : तालुक्यातील समानापूर गावातील दारूचे दुकान बंद करण्यासाठी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत जोरदार आंदोलन छेडले. “दारू बंद (Liquor Ban) करा, पाणी द्या” अशी ठाम मागणी करत संतप्त ग्रामस्थांनी कोल्हार-घोटी (Kolhar-Ghoti State Highway) या महत्त्वाच्या राज्यमार्गावर तब्बल दोन तास रास्ता रोको आंदोलन (Rasta Roko Movement) केले.गेल्या काही दिवसांपासून गावात सुरू असलेल्या दारू विक्रीमुळे महिलांसह ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी होती.
नक्की वाचा : शिर्डी जमीन व्यवहारात फसवणूक; खरात पती-पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
आंदोलनादरम्यान घोषणाबाजी
दारूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गावातील वातावरण बिघडत असून कौटुंबिक वाद, भांडणे तसेच सामाजिक समस्या वाढत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. यामुळे दारूचे दुकान तात्काळ बंद करण्यात यावे, अशी मागणी सातत्याने केली जात होती. मात्र प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामस्थांनी अखेर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आज सकाळी मोठ्या संख्येने महिला, पुरुष आणि युवक एकत्र येत त्यांनी कोल्हार-घोटी राज्यमार्ग अडवून धरला. आंदोलनादरम्यान घोषणाबाजी करत “दारूबंदी करा”, “गाव वाचवा” अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. या रास्ता रोकोमुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
पोलीस घटनास्थळी दाखल (Rasta Roko Movement)
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेता प्रशासनातील अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत त्यांची भूमिका समजून घेतली. काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असले तरी अधिकाऱ्यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. ग्रामस्थांच्या तीव्र भावना आणि वाढता रोष लक्षात घेऊन प्रशासनाने अखेर संबंधित देशी दारूचे दुकान बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. अधिकाऱ्यांकडून सकारात्मक आश्वासन मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली दरम्यान, या घटनेमुळे ग्रामीण भागात वाढत चाललेल्या दारू विक्रीविरोधातील नाराजी पुन्हा एकदा स्पष्ट झाली आहे. गावपातळीवर दारूबंदीचा प्रश्न ऐरणीवर आला असून प्रशासनाने याबाबत दीर्घकालीन आणि ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



