SIR process: कर्जत: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार २२७ कर्जत-जामखेड विधानसभा मतदार संघात विशेष पुनरीक्षण कार्यक्रम (SIR process) राबविण्यात आला असून गुरुवारी (ता.१६) प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी आढावा घेतला. यात कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात ३५६ मतदान केंद्रातील ३ लाख ५१ हजार ६७१ मतदारांपैकी २ लाख ७३ हजार ३२६ मतदारांचे एसआयआर (SIR process) प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन्ही मतदारसंघाची ७७.७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. तर अद्याप ७८ हजार ३४५ मतदारांची एसआयआर प्रक्रिया होणे बाकी आहे. तरी सर्व राजकीय पक्ष यासह सुज्ञ मतदारांनी यात १०० टक्के सहभाग घेत लोकशाही मजबूत करावी असे आवाहन प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी केले.
अवश्य वाचा- LPG गॅस सेवा कधी सुरळीत होणार? महत्वाची माहिती आली समोर
स्वयं पडताळणी आवश्यक (SIR process)
ज्या मतदारांची नावे सन २००२ च्या मतदार यादीत आहेत त्यांची नावे सन २०२४ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या मतदारयादीत आहेत त्यांचे स्वयं पडताळणी आवश्यक आहे. तसेच ज्या मतदारांची नावे २००२ च्या यादीत नाहीत परंतु २०२४ च्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या यादीत नाव आलेले आहे त्यांची पडताळणी करताना त्यांच्या वडिलांची माहिती सन २००२ च्या यादीतील (वडिलांचे विधानसभा मतदार संघ, यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक) नमूद करून पडताळणी पार पडणार आहे. त्यामुळे विवाहित महिला/ सुन यांची पडताळणी करताना त्यांच्या वडिलांच्या विधानसभा मतदार संघ, यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक माहिती बीएलओ यांनी प्राप्त केली. त्यानुसार मतदार यादी संक्षिप्त पुनरीक्षणाचे काम बिनचूक व तंतोतंत करण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. मात्र कर्जत-जामखेड मतदारसंघातील आजमितीस ७८ हजार ३४५ मतदारांची एसआयआर प्रकिया बाकी असून गुरुवारी प्रांताधिकारी नितीन पाटील यांनी कर्जत तहसील कार्यालयात सर्व राजकीय पक्ष, पदाधिकारी यांच्या प्रमुखांची बैठक बोलावली होती. मात्र त्यास देखील अल्प प्रतिसाद मिळाला. मोजकेच राजकीय पदाधिकारी यांनी बैठकीस हजेरी लावली.
नक्की वाचा- पोलिसांवर गोळीबार करणारा तब्बल नऊ वर्षांनी जेरबंद
दोन्ही मतदारसंघाचे ७७.७२ टक्के काम पूर्ण (SIR process)
कर्जत तहसीलदार यांना ९४ हजार ३२४ मतदारांचे उद्दिष्टे दिले होते. त्यापैकी ७४ हजार २९० मतदारांनी माहिती पूर्ण झाली आहे. कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना १ लाख २४९ मतदारांपैकी ७७ हजार २९० तर नगरपंचायत मुख्याधिकारी कर्जत यांना १६ हजार ९९८ मतदारांपैकी ११ हजार १२८ मतदारांनी आपली एसआयआर प्रक्रिया पूर्ण केली आहे. यासह जामखेड तहसीलदार यांनी ५१ हजार ११ मतदारांपैकी ४३ हजार ६२, गटविकास अधिकारी जामखेड ५५ हजार ६८४ पैकी ४७ हजार २६३ आणि जामखेड नगरपरिषद मुख्याधिकारी यांनी ३३ हजार ४०५ मतदारांपैकी २० हजार २१७ मतदारांचे उद्दिष्टे पार केले आहेत. कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील ३५६ मतदान केंद्रातील ३ लाख ५१ हजार ६७१ मतदारांपैकी २ लाख ७३ हजार ३२६ मतदारांचे एसआयआर प्रक्रिया पूर्ण झाली आहे. दोन्ही मतदारसंघाची ७७.७२ टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित मतदारांनी देखील या प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेत ही मतदार विशेष पुनरीक्षण कार्यक्रम १०० टक्के यशस्वी करण्याचे आवाहन प्रांताधिकारी पाटील यांनी केले.



