Ashok Kharat: अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचे अपघाती निधन  

शेळके यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरातची भागीदारी

0

Ashok Kharat: राहाता: भोंदू अशोक खरातच्या (Ashok Kharat) शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा आज (ता.१७) अपघाती मृत्यू झाला. जितेंद्र शेळके आज दुपारी १ च्या सुमारास आपल्या कुटुंबासह समृद्धी महामार्गाने छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे येत होते. धोत्रे गावालगत त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके जागीच ठार झाले. तसेच त्यांची पत्नी अनुराधा यांना वेळेत मदत न मिळाल्यामुळे त्याही जागीच ठार झाल्या. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. त्याला पुढील उपचारासाठी जवळील रुग्णालयात पाठवण्यात आले. धडक एवढी भीषण होती की, त्यांची कार अर्ध्याहून अधिक थेट कंटेनरखाली घुसली. त्यामुळे तिचा अक्षरशः चुराडा झाला.

अवश्य वाचा- पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथे धाडसी घरफोडी; पावनेतीन लाखाची रोकड लंपास

शेळके यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरातची भागीदारी (Ashok Kharat)


जितेंद्र शेळके यांची भोंदू अशोक खरात प्रकरणात चौकशी सुरू होती. एसआयटीने त्यांचा जबाबही नोंदवला होता. ते या प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार होते. त्यांच्या मृत्यूबद्दल लोकांमध्ये शंका उपस्थित होत आहे. मृत जितेंद्र शेळके खरातच्या शिवनिका ट्रस्टवर उपाध्यक्ष होते. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) त्यांचा जबाबही नोंदवला होता. त्यांची जवळपास ४ वेळा चौकशी झाली होती. त्यामुळे ते या प्रकरणातील एक महत्त्वाचे साक्षीदार होते. शेळके यांच्या मालकीच्या लॉन्समध्येही खरातची भागीदारी होती. त्यामुळे खरातला अटक झाल्यामुळे शेळके प्रचंड तणावात होते. त्यातच आज त्यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे ही घटना केवळ अपघात आहे की, घातपात आहे? याविषयी वेगवेगळ्या शंकाकुशंका व्यक्त केल्या जात आहेत.