Forest Fire : कोल्हार परिसरातील वनक्षेत्राला आग; वन्य प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी

Forest Fire : कोल्हार परिसरातील वनक्षेत्राला आग; वन्य प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी

0
Forest Fire : कोल्हार परिसरातील वनक्षेत्राला आग; वन्य प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी
Forest Fire : कोल्हार परिसरातील वनक्षेत्राला आग; वन्य प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी

Forest Fire : पाथर्डी : तालुक्यातील कोल्हार (Kolhar) परिसरातील वनक्षेत्राला बुधवारी रात्री भीषण आग (Forest Fire) लागून सुमारे दोन हजार एकर क्षेत्रातील झाडाझुडपांसह वन्य प्राणी (Wild Animals) व पक्ष्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही आग सलग तीन दिवस धुमसत राहिल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

नक्की वाचा : पाथर्डी तालुक्यातील सुसरे येथे धाडसी घरफोडी; पावनेतीन लाखाची रोकड लंपास

वन्यजीवांचे मोठे नुकसान

कोल्हार परिसरात वनविभागाकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली जाते. मात्र, या लागवडीचे योग्य संगोपन न करता केवळ औपचारिकता केली जाते, अशी टीका स्थानिक नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, जंगलात दरवर्षी ‘जाळ रेषा’ (फायर लाईन) तयार करणे आवश्यक असतानाही ती न केल्यामुळे एका ठिकाणी लागलेली आग संपूर्ण वनक्षेत्रात वेगाने पसरल्याचे सांगितले जात आहे. या आगीत हजारो नव्याने लावलेली झाडे, झुडपे तसेच सर्प, किडे, मुंग्या यांसारखे लहान प्राणी आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. वन्यजीवांचेही मोठे नुकसान झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

वनविभागाच्या हलगर्जीपणावर टीका (Forest Fire)

दरम्यान, माजी सभापती संभाजी पालवे यांनी वनविभागाच्या हलगर्जीपणावर तीव्र टीका केली आहे. “वनविभागाकडे सर्व साधनसामग्री व मनुष्यबळ उपलब्ध असतानाही केवळ इच्छाशक्तीच्या अभावामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. जाळ रेषा वेळेत केल्या असत्या तर एवढे मोठे नुकसान टळले असते असा आरोप त्यांनी केला. स्थानिक शेतकऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले, मात्र, अवश्यक साधनसामग्री नसल्याने ते अपुरे ठरले. विशेष म्हणजे, वनविभागाला वारंवार संपर्क करूनही घटनास्थळी कर्मचारी पोहोचले नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

नागरिकांमध्ये नाराजी

दरवर्षी कोल्हार डोंगरपट्ट्यात अशीच आग लागण्याच्या घटना घडत असून, त्यावर ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. झाडे लावण्यासाठी निधी असतो, पण त्यांचे संरक्षण करण्यासाठी नाही, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे अशी भावना स्थानिकांनी व्यक्त केली.अजूनही काही भागातील जंगल सुरक्षित असून, त्वरित जाळ रेषा तयार करून आगीचा प्रसार रोखण्यासाठी वनविभागाने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.