Fake dad: वडगाव पान येथील ‘भोंदू बाबा’ राजेंद्र गडगे जेरबंद; संगमनेर पोलिसांची कारवाई 

पोलिसांच्या नावाचा गैरवापर करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न

0

Fake dad:संगमनेर: भोंदूगिरीच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. वडगाव पान येथील राजेंद्र बापू गडगे या भोंदू बाबाला (Fake dad) आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्यावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज (ता.१८) दुपारी गडगे बाबा याला पोलिसांनी संगमनेर न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच दत्त धाम सरकार येथे पोलिसांनी छापा टाकत सर्व सील केले आहे. वडगाव पान परिसरात राजेंद्र गडगे हा स्वतःला सिद्ध पुरुष असल्याचे भासवून लोकांची फसवणूक करत होता. तंत्र-मंत्र आणि ‘मनशक्ती’च्या नावाखाली विविध आजारांवर उपचार करण्याचा दावा तो करत असे. या संदर्भात अंनिसच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे यांनी तपासाची चक्रे फिरवली.

अवश्य वाचा- पाथर्डीत कंटेनरवरील ताबा सुटल्याने अपघात; प्रवेश कमानीसह घरांचे नुकसान

पोलिसांच्या नावाचा गैरवापर करून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न (Fake dad)

राजेंद्र गडगे याने सोशल मीडियाचा वापर करून स्वतःच्या प्रचाराचे मोठे जाळे निर्माण केले होते. यू ट्यूब आणि इतर प्लॅटफॉर्मवर उपचारांचे दिशाभूल करणारे व्हिडिओ प्रसारित करून तो नागरिकांना आकर्षित करत होता. तपासात असेही समोर आले आहे की, त्याने पोलिसांच्या नावाचा गैरवापर करून जनतेत भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी राजेंद्र बापू गडगे (रा. वडगाव पान) आणि त्याचा साथीदार मधुकर शिंदे (रा. रहीमपूर, संगमनेर) यांना अटक केली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण साळुंखे हे करत आहे. पोलीस आता या प्रकरणातील इतर संशयितांचा शोध घेत असून, या फसवणुकीचे धागेदोरे कुठपर्यंत पसरले आहेत, याचा सविस्तर तपास सुरू आहे.