Fake Paneer : ‘पनीर’च्या नावाखाली होणारी फसवणूक थांबणार; नवीन नियमावली काय?

0
Fake Paneer : 'पनीर'च्या नावाखाली होणारी फसवणूक थांबणार; नवीन नियमावली काय?
Fake Paneer : 'पनीर'च्या नावाखाली होणारी फसवणूक थांबणार; नवीन नियमावली काय?

नगर : हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि फास्ट फूड सेंटर्समध्ये पनीरच्या (Paneer) नावाखाली ‘चीज अॅनालॉग’चा (Cheese Analog) वापर करून होणारी ग्राहकांची फसवणूक (Fake Paneer) आता थांबणार आहे. श्रीगोंदा विधानसभेचे आमदार विक्रमसिंह बबनराव पाचपुते (Vikramsinh Pachpute) यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाने १ मे २०२६ पासून सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि फास्ट फूड सेंटर्समध्ये ‘चीज अॅनालॉग’चा उल्लेख करणे बंधनकारक केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे आदेशही देण्यात आले आहेत.

नक्की वाचा: खाजगी रुग्णालयांकडून होणाऱ्या लुटीला आता ब्रेक लागणार? सरकार घेणार मोठा निर्णय

पनीर ऐवजी ‘चीज अॅनालॉग’ चा खाद्य पदार्थांमध्ये वापर (Fake Paneer)

आमदार विक्रमसिंह पाचपुते यांनी मार्च २०२५ ला विधानसभा सभागृहात पनीर ऐवजी ‘चीज अॅनालॉग’ चा खाद्य पदार्थांमध्ये वापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. अनेक खाद्य आस्थापनांमध्ये अस्सल पनीर ऐवजी ‘चीज अॅनालॉग’ या स्वस्त पदार्थांचा वापर केला जातो. चवीला पनीरसारखे वाटत असले तरी हे आरोग्य आणि गुणवत्तेच्या दृष्टीने वेगळे असते. चीज अॅनालॉग  म्हणजे अस्सल दुधाऐवजी वनस्पती तेल, स्टार्च, पाण्याचे प्रमाण आणि रसायनांचा वापर करून बनवलेला एक कृत्रिम किंवा बनावट चीजचा प्रकार आहे.

अवश्य वाचा: रोहित पवारांना २०२९ ला बारामतीतून लढायचं आहे का? युगेंद्र पवार काय म्हणाले…

हे दिसायला आणि चवीला हुबेहूब खऱ्या चीज किंवा पनीरसारखेच असते, परंतु त्यात दुधाचे प्रमाण नसतं. मात्र, ग्राहकांना याची कल्पना दिली जात नसल्याने त्यांची फसवणूक होत असल्याचा मुद्दा पाचपुते यांनी उपस्थित केला होता. तसेच यावर सरकारने कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी त्यांनी लावून घरली होती. अखेर त्यांच्या मागणीला यश आले असून, याबाबत सरकारने सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंटस् आणि फास्ट फूड सेंटर्ससाठी नियमावली लागू केली आहे. 

ही नियमावली सर्वांना पाळणे बंधनकारक आहे. याबाबत अन्न व औषध प्रशासनाने काढलेल्या आदेशात म्हटले आहे, ग्राहकांची दिशाभूल  करणाऱ्या किंवा नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल. १ मे ही या नियमांच्या अंमलबजावणीची अंतिम मुदत ठरवण्यात आली आहे. याबाबत बोलताना आमदार पाचपुते म्हणाले होते की, आपल्या सर्वांच्या आरोग्य आणि हक्कांच्या संरक्षणासाठी मी हा मुद्दा लावून धरला होता. या निर्णयामुळे खाद्य व्यवसायात पारदर्शकता येईल आणि सामान्य ग्राहकाला आपण काय खातोय, याची पूर्ण माहिती मिळेल. जागरूक ग्राहक हीच आपली ताकद आहे, असंही  ते म्हणाले होते.

नवीन नियम काय? (Fake Paneer)

राज्यभरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंटस् आणि फास्ट फूड सेंटर्ससाठी सरकारने नवीन नियम जाहीर केले आहेत. प्रत्येक पदार्थात पनीर वापरले आहे की, चीज अॅनालॉग, याचा स्पष्ट उल्लेख मेनू कार्डवर करावा लागेल. ग्राहकाला दिल्या जाणाऱ्या बिलावरही याची स्पष्ट माहिती द्यावी लागेल. हॉटेलच्या दर्शनी भागात यासंदर्भात माहिती फलक लावणे बंधनकारक असेल. असं न केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा सरकारकडून देण्यात आला आहे.