Electricity Distribution Company : पाथर्डी : तालुक्यातील मोहोज देवढे येथील शेतवस्त्यांवर पुरेशा दाबाने वीजपुरवठा (Power Supply) सुरू करण्याचे दिलेले आश्वासन पाळण्यात वीज वितरण कंपनी (Electricity Distribution Company) अपयशी ठरल्याने ग्रामस्थांचा संताप तीव्र झाला आहे. आंदोलनानंतरही परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने आता जर विजेअभावी कोणाचा मृत्यू (Death) झाला, तर संबंधित मृतदेह वीज कंपनीच्या कार्यालयासमोर आणून अंत्यविधी करू असा गंभीर इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
नक्की वाचा : खरीप हंगामासाठी सर्वंकष नियोजन करावे : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
प्रकृतीवर विपरीत परिणाम
मोहोज देवढे परिसरात मागील काही दिवसांपासून अत्यल्प दाबाने वीज पुरवठा होत असून त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. विशेषतः गावातील वयोवृद्ध नागरिकांना उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना उच्च रक्तदाब, दमा व इतर आजार असल्याने पंखे बंद पडल्याने त्यांच्या प्रकृतीवर विपरीत परिणाम होत आहे.या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी २० एप्रिल रोजी वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयास निवेदन सादर केले होते. त्यानंतर २३ एप्रिलला आंदोलनाचा इशारा देत ग्रामस्थ एकत्र आले असता, पोलिस उपनिरीक्षक संदीप ढाकणे यांच्या उपस्थितीत कक्ष अभियंता गणेश सांगळे व ग्रामस्थांमध्ये चर्चा घडवून आणण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आंदोलन तीव्र करण्याचा इशारा (Electricity Distribution Company)
या चर्चेत वीज वितरण कंपनीचे सांगळे यांनी त्याच दिवशी सायंकाळपर्यंत पुरेशा दाबाने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले.मात्र, प्रत्यक्षात आजतागायत परिस्थितीत कोणताही सुधारणा झालेली नसल्याने ग्रामस्थांनी संतप्त भूमिका घेतली आहे. राजेंद्र देवढे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या उपकार्यकारी अधिकारी जाधव यांची भेट घेऊन आपला तीव्र निषेध नोंदविला. यावेळी उन्हामुळे पंखे बंद असल्याने जर कुणाच्या जीवाला धोका निर्माण झाला, तर त्यास पूर्णपणे वीज कंपनी जबाबदार राहील असा इशारा देण्यात आला. दरम्यान, प्रशासनाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन शेतवस्त्यांवरील वीजपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.



