Siddharth Jadhav | अहिल्यानगरमध्ये ‘ॲनिमल’ झाला हाऊसफुल; सिद्धार्थ जाधव यांच्या अभिनयाची जादू

0

Siddharth Jadhav | नगर : अहिल्यानगर (Ahilyanagar) शहरातील नाट्यप्रेमींसाठी खास ठरलेला कबीर इव्हेंट्‌स आयोजित ‘ॲनिमल’ हा बहुचर्चित मराठी नाटकाचा प्रयोग सावेडी येथील माऊली सभागृहात हाऊसफुल ठरला. सिनेअभिनेता सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) यांच्या दमदार अभिनयाला नगरकरांनी टाळ्यांच्या कडकडाटात उत्स्फूर्त दाद दिली.

हे वाचा – वीरगावच्या युवा शेतकऱ्याचे काकडी उत्पादनात दमदार यश

अश्‍वमी थिएटर्स व ताराराम प्रॉडक्शन निर्मित (Siddharth Jadhav) 

अश्‍वमी थिएटर्स व ताराराम प्रॉडक्शन निर्मित या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. नाटकातून मुंबईतील चंदेरी दुनियेत आपले नशीब आजमावण्यासाठी आलेल्या ‘दत्तू’ या तरुणाचा संघर्षमय प्रवास प्रभावीपणे उलगडण्यात आला आहे. गावातून अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आलेल्या दत्तूच्या आयुष्यातील निरागसता, स्वप्ने, अपयश आणि वास्तवाचा सामना यांचा भावनिक पट नाटकातून रंगवण्यात आला आहे. दत्तूची प्रमुख भूमिका साकारणाऱ्या सिद्धार्थ जाधव यांनी शब्दोच्चार, देहबोली आणि भावनिक चढ-उतार यांमधून पात्राला जिवंत केले. त्यांच्या विनोदी प्रसंगांमुळे सभागृहात हास्याचा कल्लोळ उसळला, तर भावनिक प्रसंगांनी प्रेक्षकांना अंतर्मुख केले.

अवश्य वाचा- अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली; मुम्मका सुदर्शन यांची नियुक्ती

स्वप्नांची आणि संघर्षाची कहाणी (Siddharth Jadhav) 

नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे इतर पात्रे प्रामुख्याने मूक असूनही, नेपथ्य, प्रकाशयोजना, संगीत आणि हावभाव यांच्या माध्यमातून कथानक अधिक प्रभावी बनवण्यात आले आहे. दत्तूच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा ऑडिशनची धडपड, स्वप्नांची आस, अपयशाचा स्वीकार आणि कुटुंबीयांची आठवण अत्यंत वास्तववादी पद्धतीने साकारली आहे. ‘ॲनिमल’ हे नाटक एका सर्वसामान्य तरुणाच्या स्वप्नांची आणि संघर्षाची कहाणी आहे. ‘दत्तू शिंदे’ हा खेड्यातून आलेला, मनाने निष्पाप पण जिद्दी तरुण मुंबईत अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन येतो. मात्र, चंदेरी दुनियेतील वास्तव, स्पर्धा, नकार आणि मानसिक ताण यांचा सामना करताना त्याचे स्वप्न हळूहळू मृगजळ ठरते.

‘मूक मित्र’ ही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी (Siddharth Jadhav) 

या नाटकातून समाजातील काही ज्वलंत प्रश्‍नांवरही भाष्य करण्यात आले. महिलांवरील अत्याचार, लहान मुलींवरील बलात्कार यांसारख्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर माणसातील क्रौर्य अधोरेखित करण्यात आले, तर जनावरांमध्ये जात-धर्म नसतो पण माणूस मात्र विभाजनात अडकला आहे, हा संदेशही प्रभावीपणे देण्यात आला. कोरोना काळातील प्रसंग, तसेच आंतरराष्ट्रीय घडामोडींवर हलक्याफुलक्या शैलीत भाष्य करून प्रेक्षकांना विचार करायला भाग पाडण्यात आले. नाटकात सिद्धार्थ जाधव यांच्यासह सिद्धार्थ साळवी, पंकज पंचारिया, हृतिका अर्जुन, आदित्य पंढरे, संदीप जुवाटकर यांच्या मूक भूमिका प्रभावी ठरल्या. विशेषतः दत्तूचा ‘मूक मित्र’ ही भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहणारी ठरली.

मध्यांतरा वेळी कबीर इव्हेंट्‌सच्या वतीने संदीप कुसळकर यांनी सिद्धार्थ जाधव यांचे स्वागत केले. तसेच मुख्य प्रायोजक शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनचे नरेंद्र फिरोदिया आणि सहप्रायोजक रोझ गोल्ड-ब्रम्हाभोजचे लौकिक शिंगवी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी संजय गुगळे यांचे सहकार्य लाभले असून, सुरज ढवळे, राम गोल्हार, पृथ्वीराज गोपाळघरे यांनी विशेष परिश्रम घेतले.
संदीप कुसळकर यांनी शहरात दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम देण्याचा प्रयत्न कायम ठेवणार असल्याचे सांगितले. यापूर्वीही विविध दिग्गज कलाकारांचे कार्यक्रम यशस्वीपणे सादर करण्यात आले असून, ‘ॲनिमल’लाही प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट केले.

हे पहा – आदिनाथ महाराज शास्त्रींनी स्वतःवरच वार का केले? कारण आलं समोर…

यावेळी सिद्धार्थ जाधव यांनी नगरकरांच्या नाट्यप्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, “मराठी नाटकावरचे प्रेम आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून मी भारावलो आहे,” असे सांगितले. नाटकाचे निर्माता सिद्धार्थ जाधव असून, नेपथ्य संदेश बेंद्रे, प्रकाशयोजना श्‍याम चव्हाण, सहाय्यक दिग्दर्शक सूरज कांबळे, ध्वनी आरेखन प्रथमेश भोवड, वेशभूषा सायली पांगारे, रंगभूषा विपिन येरुणकर, सूत्रधार गोट्या सावंत, प्रकाशयोजना सामग्री रत्नकांत जगताप, संगीत संयोजक संग्राम लवटे, व्यवस्थापन सहाय्यक विलास दाते व राजेश चौधरी, तर नेपथ्य निर्मिती सुशील पांचाळ यांनी सांभाळली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here