Karjat Nagar Panchayat: कर्जत: कर्जत नगरपंचायतीच्या (Karjat Nagar Panchayat) गटनेते पदाबाबत जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्यासमोर गुरुवारी (ता.७) सुनावणी होत यात पूर्वीचे गटनेते संतोष मेहेत्रे यांनी त्यांच्याकडे बहुमत असल्याचे कुठलेही अभिलेख सादर न केल्याने जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी सतीश पाटील यांचा गटनेता असल्याबाबतचा प्रस्ताव स्वीकारत त्यांची गटनेते म्हणून निवड ग्राह्य धरली. सतीश पाटील यांनी २४ एप्रिल रोजी ९ नगरसेवकांचे स्वाक्षरी असलेले गटनेते बदलाबाबतचा प्रस्ताव आज ग्राह्य धरत मान्यता देण्यात आली. यासह आमदार रोहित पवार गटाचे उषा अक्षय राऊत आणि नामदेव राऊत यांनी देखील सतीश पाटील यांची बाजू लावून धरली.
अवश्य वाचा- इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नस्थळी चोरी; दोघा संशयीतांकडून दोन लाख ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
पाटील यांचे उपगटनेते पद बरखास्त करण्याची मागणी (Karjat Nagar Panchayat)
मागील महिन्यात गटनेते संतोष मेहेत्रे आणि उपगटनेते सतीश पाटील यांच्या अधिकार पदावरून वाद उफाळला होता. २० रोजी उपगटनेते पाटील यांनी कर्जतच्या नगरसेवकांची बैठक बोलावली होती. या बैठकीस गटनेते मेहेत्रे यांनी आक्षेप घेत सदरची बैठक बेकायदेशीर आणि घटनाबाह्य दाखवत जिल्हाधिकारी यांना पाटील यांचे उपगटनेते पद बरखास्त करण्याची मागणी केली होती. २४ एप्रिल रोजी भाजपाचे सात नगरसेवक आणि आमदार रोहित पवार गटाच्या दोन अशा एकूण ९ नगरसेवकांनी विद्यमान गटनेते संतोष मेहेत्रे मनमानी कारभार करीत असून कोणासही विश्वासात घेत नसल्याने त्यांचे गटनेते पद रद्द करावे. आणि नूतन गटनेते म्हणून सतीश पाटील यांची नियुक्ती करावी असा प्रस्ताव स्वाक्षरीसह जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडे दाखल केला. दाखल झालेल्या प्रस्तावावर जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी २९ एप्रिल आणि ५ मे रोजी दोन सुनावण्या पार पाडल्या.
नक्की वाचा- राज्य सरकारचा मोठा निर्णय! सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू; १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक (Karjat Nagar Panchayat)
अखेर ५ मे ला जिल्हाधिकारी आशिया यांनी गटनेते संतोष मेहेत्रे यांना गटनेते पदासाठी अंतरीम सूचना देत गुरुवार, दि ७ मे रोजी दुपारी साडेबारा वाजता बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित केली असता संतोष मेहेत्रे अनुपस्थित राहिले. तसेच त्यांनी आपल्याकडे कर्जत नगरपंचायतीच्या गटनेते पदासाठी बहुमत असणारे कुठलेही अभिलेख सादर न केल्याने त्यांना पदापासून दूर करण्यात आले असल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी काढला. यासह मागील ९ नगरसेवक आणि आमदार रोहित पवार गटाचे उषा राऊत व नामदेव राऊत या आणखी दोन नगरसेवकांनी नूतन गटनेते पदासाठी सतीश पाटील यांची नियुक्ती करण्यास समर्थन दर्शविल्याने १५ पैकी ११ नगरसेवकांच्या सहमतीने नूतन गटनेते म्हणून मान्यता दिली. याबाबत संतोष मेहेत्रे यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी संभाव्य घटनेवर टिप्पणी करण्यास नकार दिला.



