MLA Amol Khatal : शेतकऱ्यांना पीकविमा द्या; आमदार खताळ आक्रमक

MLA Amol Khatal : शेतकऱ्यांना पीकविमा द्या; आमदार खताळ आक्रमक

0
MLA Amol Khatal : शेतकऱ्यांना पीकविमा द्या; आमदार खताळ आक्रमक
MLA Amol Khatal : शेतकऱ्यांना पीकविमा द्या; आमदार खताळ आक्रमक

हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी

MLA Amol Khatal : संगमनेर : संगमनेर तालुक्यात खरीप हंगाम २०२५ दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. या नुकसानीचे महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करून शासनाकडे प्रस्तावही सादर करण्यात आले. मात्र, इतकी प्रक्रिया पूर्ण होऊनही तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांना अद्याप पीकविमा नुकसान भरपाई (Crop Insurance Compensation) मिळालेली नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. याबाबत आमदार अमोल खताळ (MLA Amol Khatal) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Deputy Chief Minister Eknath Shinde) तसेच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडे पूर्वीच पत्राद्वारे पाठपुरावा केला असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून दिली आहे.

हे वाचा – गावातच मिळत आहेत शासकीय सेवा; नागरिकांचा मानसिक ताण होतोय कमी

आमदार खताळ यांनी म्हटले आहे की,

अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तालुक्यांना नुकसान भरपाई व पीकविमा अनुदान मंजूर करण्यात आले असून अनेक तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये विमा रक्कम जमा झाली आहे. मात्र, संगमनेर तालुक्यातील शेतकरी अद्यापही विमा रकमेपासून वंचित आहेत. संबंधित शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची हलगर्जी, दिरंगाई आणि उदासीनता यामुळेच ही परिस्थिती निर्माण झाल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. यामुळे आधीच नैसर्गिक संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आणखी मोठ्या संकटाला सामोरे जावे लागत आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तातडीने पीकविमा रक्कम जमा करण्याची मागणी (MLA Amol Khatal)

शासनाने या प्रकरणाची तत्काळ दखल घेऊन दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, तसेच संगमनेर तालुक्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पीकविमा रक्कम जमा करण्यासाठी संबंधित विभागांना स्पष्ट निर्देश द्यावेत, अशी मागणी आमदार खताळ यांनी केली आहे. दरम्यान, पीकविमा प्रश्नावर काहीजण राजकारण करत असल्याचा आरोप करत त्यांनी विरोधकांवरही अप्रत्यक्ष निशाणा साधला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण सातत्याने आवाज उठवत आलो असून, शेतकऱ्यांच्या न्यायासाठी लढा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मी सातत्याने विधानसभेत आणि शासन स्तरावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवत आलो आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडेही याबाबत पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे. मात्र, काही अधिकारी दिरंगाई करत असून त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. शेतकऱ्यांच्या हक्काचा विमा तत्काळ मिळाला पाहिजे. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आणखी तीव्र आंदोलन उभारावे लागेल. दुर्दैवाने काहीजण या विषयातही राजकारण करून स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत; पण मी शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढत राहणार आहे.

  • — अमोल खताळ, आमदार