Monsoon : यंदा मान्सून वेळेतच धडकणार; हवामान खात्याचा अंदाज आला…

0
Monsoon : यंदा मान्सून वेळेतच धडकणार; हवामान खात्याचा अंदाज आला…
Monsoon : यंदा मान्सून वेळेतच धडकणार; हवामान खात्याचा अंदाज आला…

Monsoon : नगर : राज्यात सध्या भीषण उन्हाळा आणि अंगाची लाहीलाही करणारा उकाडा जाणवत असतानाच हवामान खात्याकडून एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदाचा मान्सून अंदमानात आपल्या ठरलेल्या वेळेच्या आधीच धडकण्याची शक्यता आहे. खाजगी हवामान संस्था ‘स्कायमेट’च्या अंदाजानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण होत असलेल्या अनुकूल परिस्थितीमुळे मान्सूनच्या प्रवासाला वेग मिळाला असून लवकरच अंदमान निकोबार बेटांवर पावसाच्या सरी कोसळण्यास सुरुवात होईल.

हेही वाचा : अहिल्यानगर जिल्ह्यात उष्मालाटेचा ‘यलो अलर्ट’; उष्माघातापासून बचावासाठी प्रशासनाचे आवाहन

कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सून सक्रिय

हवामान शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ आणि १३ मे दरम्यान विषुववृत्तीय प्रदेशाजवळ आणि दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. या हवामान प्रणालीमुळे विषुववृत्तीय वाऱ्यांचा वेग वाढणार असून मान्सूनला पुढे सरकण्यासाठी मोठी चालना मिळेल. यापूर्वी मान्सूनचे आगमन १४ ते २२ मे दरम्यान होईल असा अंदाज होता, मात्र आता हे आगमन त्याआधीच होण्याची चिन्हे गडद झाली आहेत. भारतीय हवामान विभागानेही १४ ते २० मे दरम्यान अंदमान समुद्रात नैर्ऋत्य वारे सक्रिय होतील, असा दुजोरा दिला आहे.

नक्की पहा : होय, पेट्रोलचा वापर जपूनच करावा…मोदींच्या मताशी सहमत

महाराष्ट्रात कधी आगमन… (Monsoon)

साधारणपणे, मान्सून दाखल एकदा अंदमानात झाला की तिथून कोकणापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला सुमारे २१ दिवसांचा कालावधी लागतो. जर अंदमानात मान्सूनने वेळेपूर्वी हजेरी लावली, तर महाराष्ट्रातही यंदा पावसाचे आगमन वेळेवर किंवा काही दिवस आधीच होण्याची दाट शक्यता आहे. यामुळे भीषण उकाड्याने त्रस्त असलेल्या महाराष्ट्रवासीयांना मोठा दिलासा मिळू शकतो.