Paper Leak : नगर : पुणे येथून पसार झालेला NEET पेपर फुटी प्रकरणातील आरोपी धनंजय लोखंडे याला पकडण्यात अहिल्यानगर पोलिसांना मोठे यश आले आहे. नाशिकच्या नांदगाव मधील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली तेव्हा पोलिसांना लोखंडे याचीही माहिती मिळाली होती. सुरवातीला पुण्यात पोलिस त्याच्या मागावर होते. मात्र पुण्यात पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी लोखंडे पुण्याबाहेर पळाला होता. तो अहिल्यानगरमध्ये असल्याची पक्की माहिती मिळताच, पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला शिताफीने ताब्यात घेतले.
हेही वाचा : बनावट ब्रँडेड शॅम्पू विक्री करणारी टोळी जेरबंद;एमआयडीसी पोलिसांची नागापूर आठवडे बाजारात कारवाई
लोकेशनच्या आधारे शोध
लोखंडे मूळचा अहिल्यानगरचा असला तरी त्याचे वास्तव्य पुण्यात होते आणि येथूनच तो संपर्कात असल्याचा संशय आहे. नाशिकचा आरोपी खैरनार पकडला गेल्यावर लोखंडे पुण्यात मोबाईल बंद करून बसला होता. पुणे पोलिस मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेत असताना तो नगरला पळाला. सीबीआयचे पथकही त्याच्या मागावर होते. त्यांच्या सूचनेनुसार पहाटे लोखंडे याला नगरमध्ये पकडण्यात आले.
नक्की पहा : एमआयडीसी पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; पावणे चार लाखांचा मुद्देमाल हस्तगत
कसून चौकशी (Paper Leak)
तो सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्याची कसून चौकशी केली जात आहे. अहिल्यानगर पोलीस लवकरच धनंजय लोखंडेला सीबीआयच्या स्वाधीन करणार असल्याची माहिती आहे. पेपर फुटीच्या या रॅकेटची व्याप्ती किती मोठी आहे? पेपर नेमका कुठून आणि कसा लीक झाला? उमेदवारांकडून किती पैसे घेतले गेले आणि ते कोणाकोणापर्यंत पोहोचले? याचा तपास केंद्रीय पातळीवरून सुरू आहे.



