Rahata News : राहाता तालुक्यातील गर्भलिंगनिदान व गर्भपात रॅकेटवर कारवाईची मागणी

शासनावर पारदर्शक तपासाची जबाबदारी वाढली

0
Rahata News : राहाता तालुक्यातील गर्भलिंगनिदान व गर्भपात रॅकेटवर कारवाईची मागणी
Rahata News : राहाता तालुक्यातील गर्भलिंगनिदान व गर्भपात रॅकेटवर कारवाईची मागणी

Rahata News : राहाता : शहर व तालुका परिसरात गर्भलिंग चाचणी आणि बेकायदेशीर गर्भपात (Abortion) करणारी डॉक्टर (Doctor) व त्यांच्या एजंटांची मोठी टोळी सक्रिय असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena) तालुका अध्यक्ष गणेश जाधव यांच्याकडून करण्यात आला असून, या संबंधित अतिरिक्त पोलीस अधीक्षक व अपर जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

नक्की वाचा : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रति आखाडा पाच कोटींचा निधी; फडणवीस यांची घोषणा

आरोपीस तत्काळ अटक करण्याची मागणी

या प्रकरणातील मुख्य आरोपीस तत्काळ अटक करण्याची जोरदार मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. डॉक्टर व त्यांची टोळी पैशाच्या लोभापोटी कोवळ्या जीवांवर अन्याय करणाऱ्या या प्रकारांमुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, प्रशासनाने अश्या निर्दयी डॉक्टर व त्यांच्या टोळीवर कठोर व निर्णायक कारवाई करावी, अशी मागणी केली गेली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

निवेदनात म्हटले आहे की (Rahata News)

निवेदनात म्हटले आहे की, या रॅकेटमध्ये राहाता शहरातील काही मोठे डॉक्टर सहभागी असल्याचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संशय असून, दिवसाढवळ्या सुरू असलेल्या या प्रकारांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.निर्मळ पिंपरी येथे करण्यात आलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये डॉक्टरांसह एजंटांना पकडण्यात आल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले. मात्र, या कारवाईपुरतेच थांबून न राहता संपूर्ण साखळीचा शोध घेऊन मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी यावेळी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

शासनावर पारदर्शक तपासाची जबाबदारी वाढली

याशिवाय, काही शासकीय अधिकाऱ्यांच्या भूमिकेबाबतही शंका उपस्थित करण्यात आली असून, चार महिन्यांपूर्वी संबंधित विषयाची माहिती राहाता तहसीलदार आणि आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आली होती. त्यावर काय कार्यवाही झाली, संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. या गंभीर आरोपांमुळे प्रशासनावर पारदर्शक तपासाची जबाबदारी आता वाढली आहे.

जनआंदोलन उभारण्याचा इशारा

दररोज होणारे कोवळ्या जीवांचे बळी थांबावेत, यासाठी तत्काळ कठोर आणि प्रभावी कारवाई आवश्यक असल्याचे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठे जनआंदोलन उभारेल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे आता प्रशासनाच्या भूमिकेकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले असून, या प्रकरणातील पुढील कारवाई ही कायद्याच्या अंमलबजावणीची खरी कसोटी ठरणार आहे.