Onion Price : नगर : केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत, नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केल्या जाणाऱ्या कांद्याच्या दरात वाढ केली आहे. नवीन दर आजपासून (ता. २६ ) लागू झाले असून, वाढीव खरेदी दरामुळे शेतकऱ्यांना आता १५८० रुपये प्रति क्विंटल भाव मिळणार आहे.
हेही वाचा : जिल्ह्यात १० अवैध दारू विक्रेत्यांसह जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
शासनाचे आदेश जारी
भारत सरकारच्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयांतर्गत ग्राहक व्यवहार विभागाच्या कॉस्टिंग सेलने यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. आतापर्यंत 1235 प्रति क्विंटल दराने सरकार शेतकर्यांचा कांदा खरेदी करीत होते. आजपासून ’सदर आदेशानुसार रब्बी कांद्याच्या खरेदीसाठी नाफेड व एनसीसीएफमार्फत हमी दराने खरेदी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मागील काही महिन्यांपासून कांद्याचे बाजारभाव उत्पादन खर्चापेक्षाही कमी मिळत असल्याने शेतकर्यांमध्ये तीव्र नाराजी होती.
नक्की पहा : बकरी ईदची महापालिका प्रशासनाकडून जय्यत तयारी
शेतकऱ्यांना दिलासा (Onion Price)
अनेक शेतकर्यांना कांदा साठवणूक करूनही अपेक्षित दर मिळत नव्हते. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने जाहीर केलेला मॅप दर कांदा उत्पादकांसाठी काही प्रमाणात आधार देणारा ठरणार असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, शेतकरी संघटनांकडून कांद्याला किमान 2 हजार रुपये प्रतिक्विंटल दर देण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.



