Ancient Inscriptions : पुष्करणी बारवेवर आढळला प्राचीन शिलालेख; शिवदुर्गकडून श्रीगोंद्यातील ४५व्या शिलालेखाचे वाचन

Shivdurg Trekkers

0
Ancient Inscriptions : पुष्करणी बारवेवर आढळला प्राचीन शिलालेख; शिवदुर्गकडून श्रीगोंद्यातील ४५व्या शिलालेखाचे वाचन
Ancient Inscriptions : पुष्करणी बारवेवर आढळला प्राचीन शिलालेख; शिवदुर्गकडून श्रीगोंद्यातील ४५व्या शिलालेखाचे वाचन

Ancient Inscriptions : नगर : श्रीगोंदा तालुक्यातील म्हातारपिंप्री येथील गावाच्या पूर्वेस पाझर तलावात बुजलेली बारव संवर्धनाचे कार्य ग्रामस्थांनी सुरू केले असून नितीन वाबळे व ग्रामस्थांना बारवमध्ये शिलालेख आढळून आला. शिवदुर्गचे संस्थापक अध्यक्ष तथा इतिहास संशोधक राजेश इंगळे व सचिन भोसले यांनी सदर शिलालेखाची तातडीने नोंद घेतली. पुण्यातील शिलालेख वाचक अनिल दुधाणे यांनी तातडीने वाचन केले व नव्याने ऐतिहासिक वारसा व माहिती उजेडात आली.

नक्की वाचा :  ऐतिहासिक काशी बारव संरक्षित होणार; ‘शिवदुर्ग’च्या पाठपुराव्याला यश

हा शिलालेख म्हातारपिंपरी येथील गावापासून थोड्या अंतरावर असलेल्या पाझर तलावात एक पुष्करणी आहे त्या पुष्करणीच्या पायऱ्या उतरताना डाव्या बाजूला काठावर कोरलेला आहे. सदर शिलालेख हा कोरीव स्वरूपाचा असून पाच ओळींचा देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेला आहे. जागेअभावी लेखात अनेक ठिकाणी शब्दांची संक्षिप्त रूपे दिली असून लेखाच्या शेवटी नांगराचे चिन्ह कोरले आहे. शिलालेख अनेक वर्ष उघड्यावर असल्याने तसेच काही काळ पाण्यात असल्याने त्यावर परिणाम झाला असून लेखातील काही अक्षरे झिजली आहेत तर काही अक्षरे फुटली आहेत. लेखाचा खडूने छाप घेतला असता त्यावरील मजकूर थोड्या प्रयत्नाने सहज वाचता येतो.

शिलालेख ओळी

१.(श्रीभैरव)नाथ चरणी तत्पर दौलतराव व मुगट राव /
२.व मानाजीराव व॥ जानराव को वाबळे ईबन येमाजी /
३.प॥ वा॥ मो। मौजे ह्मातार पींपरी प्र॥ कर्डे यांनी हे तीर्थ /
४.पुष्कर बारव बांधली असे सके १६९६ माघ सुध ७मी बी॥ सदासी /
५.व व्यंकटेश कु॥णी मौजे म॥र नी॥नांगर मु॥ खंडोजी पो। दी॥ म॥र

नक्की पहा : प्रेमाचं नातं रक्तात माखलं; भर रस्त्यात पत्नीवर 50 वार!

शिलालेखाचा अर्थ (Ancient Inscriptions)

शालिवाहन शकाच्या १६९६ व्या वर्षी जय नाम संवत्सरात वैशाख शुद्ध १३ म्हणजेच ७ फेब्रुवारी १७७५ मंगळवार या दिवशी श्री भैरवनाथाच्या चरणी निष्ठा ठेवणाऱ्या दौलतराव, मुगटराव आणि मानाजीराव हे जानराव यांचे पुत्र असून ते वाबळे घराण्यातील व येमाजी यांच्या वंशातील होते. या वाबळे पाटील व मुकादमांनी मौजे म्हातार पिंपरी, प्रांत कर्डे येथे लोककल्याणार्थ हे पवित्र तीर्थरूप “पुष्कर बारव” बांधले. व हा धर्मोपयोगी उपक्रम पूर्ण झाला. या शिलालेखाच्या लेखन व नोंदणीचे कार्य सदाशिव व्यंकटेश कुलकर्णी यांनी केले. लेखात उल्लेखिलेली “नांगर” ही मुकादमाची अधिकृत निशाणी असून, त्यावरून त्या काळातील ग्रामप्रशासन व पाटीलकीची परंपरा स्पष्ट होते. तसेच खंडोजी परगण्यातील अधिकाऱ्यांचा या कार्याशी संबंध असल्याचेही सूचित होते.