BJP | विखे, कोल्हे, पाचपुते आणि आता तनपुरे… भाजपने असे फोडले साखरसम्राट

0

BJP | अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा समजला जातो. या जिल्ह्याने अनेक सामाजिक व राजकीय स्थित्यंतरे पाहिली, पचवली आणि स्वीकारलीही… यात आता नवा अध्याय जोडला जात आहे, तो म्हणजे ‘भाजप पर्वाचा’. भारतीय स्वातंत्र्यानंतर कम्युनिस्टांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असलेल्या या जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व आता भाजप (BJP) अशी स्थित्यंतरे झाली. १९९५मध्ये विधानसभेवर पहिला आमदार व १९९६मध्ये पहिला खासदार देणाऱ्या भाजपचा अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रवास आता राजकीय वर्चस्वापर्यंत पोहोचला आहे. यातच आता  प्राजक्त तनपुरेंसारखे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील शरद पवार गटाचे निष्ठावान भाजपच्या गोटात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

हे वाचा – साकूर-टेकडवाडीचा पूल बनला धोकादायक; तातडीने संरक्षण कठडे बसविण्याची मागणी

औटी कम्युनिस्ट पक्षाचे भारतातील पहिले आमदार (BJP)

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेस व नंतर कम्युनिस्ट विचारधारेने अहिल्यानगर जिल्ह्याचे राजकारण व्यापले होते. रावसाहेब पटवर्धन, भाऊसाहेब फिरोदिया, मोतिलाल फिरोदिया, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या सारखे दिग्गज काँग्रेसकडे होते. तर कम्युनिस्टांकडे भास्करराव औटी, वकीलराव लंघे, पी.बी. कडू, दत्ता देशमुख, भाई सथ्था, बाबाजी आव्हाड, आबासाहेब काकडे, भाऊसाहेब थोरात, शिवाजीराव नागवडे, चंद्रभान आठरे पाटील यांच्या सारखे दिग्गज नेते मंडळी होती. भास्करराव औटी हे तर कम्युनिस्ट पक्षाचे भारतातील पहिले आमदार होते.

नक्की वाचा : पारनेर शहरातील महामार्गाच्या कामाला गती द्या; पालकमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

कम्युनिस्ट नेतृत्वाला पहिला धक्का (BJP)

संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या चळवळीत कम्युनिस्ट नेत्यांनी जिल्हा पिंजून काढला. त्यांना जिल्ह्यातील नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला होता. मात्र, महाराष्ट्र निर्मितीनंतर यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री झाले. त्यांनी कम्युनिस्ट नेत्यांना काँग्रेसमध्ये घेण्यास सुरूवात केली. भाऊसाहेब थोरात, शिवाजीराव नागवडे यांच्यासारखे कम्युनिस्ट नेते काँग्रेसमध्ये गेले. हा जिल्ह्यातील कम्युनिस्ट नेतृत्वाला पहिला धक्का होता. त्यानंतर नंदकुमार झावरे यांच्यासारखे कम्युनिस्ट नेतेही काँग्रेसमध्ये दाखल झाले. मात्र, तरीही पी.बी. कडू, चंद्रभान आठरे पाटील, वकीलराव लंघे, बाबासाहेब ठुबे यांनी कम्युनिस्ट पक्षाची मशाल तेवत ठेवली.

१९७५च्या सुमारास जिल्ह्यात जनता पक्षाने स्वतःचे पाय रोवले. बबनराव ढाकणे, बबनराव पाचपुते, युक्रांदचे कुमार सप्तर्षी यांच्यासारख्यांनी जिल्ह्यात जनता पक्षाची ताकद वाढवली. पुढे जनता पक्ष फुटल्यावर बबनराव पाचपुते काँग्रेस मार्गे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले. बबनराव ढाकणेची ताकद भाजपच्या गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय उदयानंतर कमी होत गेली. वकीलराव लंघे यांचे सुपूत्र विठ्ठलराव लंघे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणे पसंत केले. आबासाहेब काकडे यांचे सुपुत्र शिवाजीराव काकडे काही काळ भाजपमध्ये गेले होते, असे करत कम्युनिस्टांचे नेते काँग्रेस-राष्ट्रवादीच्या वळचणीला दिसून आले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अस्तित्व (BJP)

भारत स्वातंत्र्याच्या पूर्वीपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील शहरी भागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अस्तित्व आहे. माणिकराव पाटील हे आरएसएसचे उत्तर महाराष्ट्र प्रांतप्रमुख होते. त्याच काळात जनसंघाचे जनता पक्षात विलीनीकरण व नंतर भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली. सूर्यभान वहाडणे व ना.स. फरांदे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात सुरुवातीला जनसंघ व नंतर भाजप रुजविण्यात महत्वाची भूमिका बजावली. हे दोघेही विधान परिषदेचे आमदार व काहीकाळ सभापती होते. १९९०च्या सुमारास राम जन्मभूमी आंदोलनानंतर जिल्ह्यातील भाजपची ताकद वाढत गेली. अहिल्यानगर शहरात अभय आगरकर व लता लोढा हे भाजपकडून नगराध्यक्ष राहिले. तसेच शिवसेनेबरोबर भाजपने सुरुवातीला नगरपालिका व नंतर महापालिकेतही सत्ता मिळवली. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत सदाशिव लोखंडे यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघातून विजय मिळवत भाजपला अहिल्यानगर जिल्ह्यातून पहिला आमदार होण्याचा मान मिळवला. ते सलग तीन टर्म आमदार होते. १९९९मध्ये भाजपचे दगडू बडे हे पाथर्डी विधानसभा मतदारसंघातून तर राहुरी मतदार संघातून चंद्रशेखर कदम आमदार झाले. गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वामुळे पाथर्डी व शेवगाव तालुक्यात भाजपची ताकद वाढत गेली.

यातच १९९५ला या राजकीय समीकरणांना बाळासाहेब विखे पाटलांनी तडा देत शिवसेनेत प्रवेश केला. या राजकीय प्रवेशामुळे भाजप व शिवसेना युतीची ताकद वाढली. भीमराव बडदे हे कोपरगाव लोकसभा मतदारसंघातून भाजपचे पहिले खासदार करण्यात बाळासाहेब विखे पाटलांचा हात होता. त्यामुळे बडदे हे भाजपचे जिल्ह्यातील पहिले खासदार झाले. पुढील लोकसभा निवडणुकीत बाळासाहेब विखे पाटील कोपरगाव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवत खासदार झाले. त्यावेळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून दिलीप गांधी यांना भाजपने उमेदवारी दिली. पुढे त्यांना केंद्रात राज्यमंत्रीपदही मिळाले. अशोक काळेंसारखे महत्वाचे नेते शिवसेनेत दाखल झाले. त्यामुळे कोपरगाव परिसरात शिवसेनेची ताकद वाढली. मात्र, पुन्हा राजकीय समीकरणे बदलली, विखे पाटील काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे जिल्ह्यात काँग्रेसची ताकद वाढली. मात्र, २०१४ मध्ये पुन्हा जिल्ह्यात भाजपची लाट आली. स्नेहलता कोल्हे, बाळासाहेब मुरकुटे, मोनिका राजळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. एकाच वेळी भाजपचे पाच आमदार होते. २०१९ मध्ये विखेही भाजपत दाखल झाले आणि जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली खरी मात्र, आमदारांची संख्या घटली. २०२४च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या डॉ. सुजय विखे पाटलांचा पराभव झाला. शिर्डी लोकसभा मतदारसंघातही महायुतीची पिछेहाट झाली. मात्र, विधानसभा निवडणुकीत विखे पाटलांनी जिल्हा पिंजून काढला. राजकीय खेळ्या करत बाळासाहेब थोरात, शंकरराव गडाख, प्राजक्त तनपुरे, प्रताप ढाकणे, खासदार निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके यांना पराभवाचा धक्का दिला. संगमनेरमधून आमदार झालेले शिवसेनेचे अमोल खताळ हे निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये होते. त्यामुळे ते पुन्हा स्वगृही परतू शकतात. तसेच थोरात-तांबे गट भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा अधून मधून सुरूच असते. त्यामुळे संगमनेरमधील पुढील आमदार भाजपचा असेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

यातच २०१९मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वैभव पिचड यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे नाराज झालेले ज्येष्ठ नेते शरद पवार व अजित पवार यांनी अकोले विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवत पिचडांच्या ४० वर्षांच्या सत्ताकारणाची धुळधान केली. २०१४मध्येही बबनराव पाचपुते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडत भाजपकडून उमेदवारी मिळवली होती. त्यावेळी शरद पवार व अजित पवार यांनी श्रीगोंदा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडवत पाचपुतेंना पराभवाचा धक्का दिला होता. २०१९मध्ये पाचपुतेंनी भाजपकडून निवडणूक लढवत पुन्हा आमदारकी मिळवली होती. मात्र, पिचडांना तसे शक्य झाले नाही. २०१४ ते २०१९ या कालावधीत राम शिंदे हे जिल्ह्याचे पालकमंत्री होते. २०१९नंतर त्यांना त्यांच्या कर्जत-जामखेड मतदारसंघात विजयी होता आले नाही. असे असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपशी एकनिष्ठ असल्याचा फायदा त्यांना झाला. विधानपरिषद निवडणुकीत त्यांना विजय मिळाला. फडणवीसांनी त्यांना विधान परिषदेचे सभापती केले. या मागे फडणवीसांचे राजकारण असल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात. असे असले तरी राम शिंदे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यातील भाजपच्या कार्यक्रमांत विशेष लक्ष घालत आहेत. त्यामागे विखेंना काटशह देण्याचे राजकारण असल्याची चर्चा आहे.

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले साखर सम्राट नेते मंडळी भाजपमध्ये जाण्याची प्रघात तयार झाला. कोल्हे, पाचपुते, पिचड, विखे यांच्या सारखे दिग्गज साखर सम्राट घराणी भाजपत आहेत. आता यात नवीन नाव जोडले जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे, ते म्हणजे प्राजक्त तनपुरे यांचं. तनपुरे यांचे आजोबा हे बाबूराव तनपुरे हे काँग्रेसचे नेते व राहुरी तालुक्यात आमदार होते. तर प्राजक्त तनपुरेंचे वडील प्रसाद तनपुरे हे माजी खासदार आहेत. माजी मंत्री जयंत पाटील हे प्राजक्त तनपुरेंचे मामा आहेत. तनपुरे यांच्याकडे एक सहकारी व एक खासगी साखर कारखाना आहे.

दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या विरोधात प्राजक्त तनपुरे  यांनी दोनदा विधानसभेची निवडणूक लढवली होती. यात त्यांना एकदा विजय तर एकदा पराजय स्वीकारावा लागला होता. शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे जाहीर झालेल्या पोटनिवडणुकीत प्राजक्त तनपुरे इच्छुक होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मध्यस्थी करत प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी अर्ज दाखल न करण्यास सांगितले. त्यानुसार तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल न केल्याने शिवाजीराव कर्डिले यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याचे राजकीय विश्लेषक सांगतात.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

तनपुरे यांना उमेदवारी अर्ज न भरण्याच्या बदल्यात विधान परिषदेचे आमदार करण्याची चर्चा आहे. अशातच तनपुरे हे ३० मे रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे विश्वसनिय सूत्रांकडून समजते. या राजकीय घडामोडींमुळे जिल्हा राजकीयदृष्ट्या भाजपमय होत असल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here