Robbery : पाथर्डी : तालुक्यातील खरवंडी कासार परिसरात बुधवारी (ता. १०) पहाटे अज्ञात सात जणांच्या सशस्त्र टोळीने दोन कुटुंबांवर हल्ला करून सोन्याचे दागिने (Gold jewelry) व रोख रक्कम असा सुमारे साडेचार लाख रुपयांचा ऐवज लुटल्याची (Robbery) धक्कादायक घटना घडली. दरोडेखोरांनी घरात घुसून कुटुंबीयांना मारहाण (Assault) केली तसेच चाकूचा धाक दाखवत दागिने व रोख रक्कम लंपास केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
नक्की वाचा : लग्नाच्या बोहल्यावर नेऊन लाखोंची फसवणूक; मोबाईल बंद करून ‘लुटेरी दुल्हन’ पसार
प्रतिकार करण्याचा प्रयत्न
किर्तनवाडी येथील शेतकरी रावसाहेब बाजीराव कितने (वय ५३) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी (ता. ९) रात्री कुटुंबीय झोपलेलेअसताना बुधवारी (ता. १०) पहाटे साडेएकच्या सुमारास त्यांच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील कुलूप तोडून सात जणांची टोळी घरात शिरली. त्यापैकी एक जण बाहेर थांबला होता. घरात घुसलेल्या आरोपींनी कपाटांचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम शोधण्यास सुरुवात केली. किर्तने यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी लोखंडी गज व धारदार हत्याराने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या गळ्यातील सोन्याची चैन व हातातील अंगठी जबरदस्तीने काढून घेतली. तसेच पत्नी अनिता, मुलगा सागर व सून शितल यांनाही मारहाण करून त्यांच्या अंगावरील व कपाटातील दागिने हिसकावून घेतले. जिवे मारण्याची धमकी देत घरातील सर्व मौल्यवान वस्तूंची माहिती विचारण्यात आली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
आनखी एका घरावर दरोडा (Robbery)
दरम्यान, सागर किर्तने यांनी एका खोलीतून नातेवाईकांना दूरध्वनीवरून माहिती दिली. गावातील नागरिक घटनास्थळी येत असल्याचे लक्षात येताच आरोपींनी पळ काढला. या दरोड्यात किर्तने कुटुंबाचे सुमारे ३ लाख ७ हजार ५०० रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम लंपास झाली. याच टोळीने काही वेळानंतर किर्तनवाडीपासून सुमारे ८०० मीटर अंतरावर असलेल्या बाबासाहेब दशरथ बटुळे यांच्या घरावरही दरोडा टाकला. आरोपींनी बाबासाहेब बटुळे व त्यांच्या पत्नीला मारहाण करून सुमारे १ लाख ६३ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व ४० हजार रुपयांची रोख रक्कम लुटली. तसेच भागवत बाबुराव बटुळे व शांताराम बप्पा बटुळे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.
खरवंडी कासार परिसरात दरोड्यांच्या घटनांमध्ये वाढ
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना आवश्यक सूचना दिल्या असून पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांच्या नेतृत्वाखाली एक पथक व स्थानिक गुन्हे शाखेचे पथक संयुक्तरीत्या तपास करत आहे. खरवंडी कासार परिसरात गेल्या काही महिन्यांपासून जबरी चोरी व दरोड्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या गुन्ह्यांचा तातडीने छडा लावून आरोपींना अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.



