FDA : नागरिकांकडून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीचे स्वागत; पूर्वीच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचा निषेध

0
FDA : नागरिकांकडून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीचे स्वागत; पूर्वीच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचा निषेध
FDA : नागरिकांकडून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नियुक्तीचे स्वागत; पूर्वीच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचा निषेध

FDA : नगर : अन्न व औषध प्रशासन आयुक्त पदाचा पदभार स्वीकारताच अवघ्या तीन दिवसांत भेसळखोरांवर सर्जिकल स्ट्राईक करणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या पाठीशी आता नागरिक उभे राहत आहे. अहिल्यानगरमध्ये सुप्रभात मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य आणि जागरूक नागरिकांनी एकत्र येत जॉगिंग ट्रॅकवर अनोखे आंदोलन केले. या आंदोलनात तुकाराम मुंढे यांचा ‘अभिनंदन फलक’ लावून त्यांनी अन्न भेसळ विरोधात सुरु केलेल्या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे. तर पूर्वीच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांचा चव्हाट्यावर ‘निषेध करणारा फलक’ लावून नागरिकांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला.

हेही वाचा : सागर मोहळकर हत्याकांडात ‘चार्जशीट’ न दाखल झाल्याने आरोपीला मिळाला जामीन!

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


तुकाराम मुंढे यांनी पदभार घेताच अवघ्या तीन दिवसांत 53 धाडी टाकून 33 भेसळखोरांना गजाआड केले, तसेच कोट्यवधी रुपयांचा बनावट व भेसळयुक्त मुद्देमाल जप्त केला. “जर तीन दिवसांत एवढी मोठी कारवाई होऊ शकते, तर यापूर्वीचे अधिकारी वर्षानुवर्षे काय करत होते?” असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला आहे. या संदर्भातील एक सविस्तर मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांना देण्यात आले. जनतेच्या आणि लहान मुलांच्या आरोग्याशी थेट संबंध असलेल्या FDA विभागात तुकाराम मुंढे यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्याची नियुक्ती केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर आभार मानण्यात आले. पूर्वीच्या निष्क्रिय अधिकाऱ्यांची चौकशी करा, ज्यांच्यामुळे भेसळखोरांचे रॅकेट फोफावले, अशा तत्कालीन अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

नक्की पहा : भाविकांच्या आरोग्याची हेळसांड खपवून घेतली जाणार नाही; सुजय विखे पाटील यांचा इशारा

मुंढे यांच्या बदलीची ‘फिल्डिंग’ रोखा (FDA)

प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली करण्यासाठी भ्रष्ट लॉबी आणि हितसंबंधी सक्रिय होण्याची शक्यता असते. शासनाने कोणत्याही दबावाला बळी न पडता मुंढे याच पदावर पूर्ण संरक्षण द्यावे, अशी मागणी नागरिकांनी लावून धरली आहे. या आंदोलनातून अहिल्यानगरमध्ये सध्या प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या समर्थनार्थ आणि भ्रष्ट व्यवस्थेच्या विरोधात एल्गार पुकारण्यात आला. यावेळी सुप्रभात ग्रुपचे सदस्य आणि सामाजिक कार्यकर्ते शिवाजीराव साळवे यांच्या पुढाकारातून समवेत ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल लांडगे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सोनवणे, विजय कुलाळ, साहेबराव आनंदकर, शैलेश राजगुरू, सुभाष मिसाळ, सूर्यकांत दगडे, भास्कर मिसाळ, बाळकृष्ण आव्हाड, वसंत सिंग, सुनील राऊत, रमेश पळसे, सुनील कुलकर्णी, बाळासाहेब कुलकर्णी, राजेंद्र दासरी, विजय पाटोळे, जालिंदर तनपुरे स्वानंदी महिला ग्रुपच्या सर्व सदस्या सौ. सोनल जोशी, आशा विधाते, संध्या वारे, वर्षा गुरनानी आदी उपस्थित होते.