
Tukaram Mundhe : संगमनेर : राज्यातील अन्न व औषधांमधील भेसळ (Adulteration) रोखण्यासाठी धडाकेबाज कामगिरी करणारे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांच्या पाठीशी संगमनेरकर नागरिक ठामपणे उभे राहिले आहेत. ‘मुंढे साहेबांची बदली करू नये, अन्यथा संगमनेरकर जनता तीव्र आंदोलन छेडेल,’ असा थेट इशारा देणारे निवेदन संगमनेरमधील जागरूक नागरिकांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना पाठवले आहे.
नक्की वाचा : संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी कार्याची इतर आमदारांनी प्रेरणा घ्यावी : संग्राम भंडारे
स्थानिक अन्न प्रशासनाची भूमिका नेहमीच संशयास्पद
संगमनेरकरांनी निवेदनात म्हटले आहे की, सर्वसामान्यांच्या दैनंदिन गरजेच्या अन्नपदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट व घातक साहित्य वापरले जात असल्याचे आरोप सातत्याने होत होते. मात्र, स्थानिक अन्न प्रशासनाची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली. मुंढे साहेब आयुक्त म्हणून येण्यापूर्वी कोणतीही ठोस कारवाई केली जात नव्हती. बनावट खवा, पनीर, भेसळयुक्त दूध, निकृष्ट तेल आणि बोगस औषधांमुळे सर्वसामान्य जनतेचे, विशेषतः लहान मुले व वृद्धांचे आरोग्य धोक्यात आले होते. या भेसळयुक्त अन्नपदार्थांमुळे नागरिकांना कॅन्सर, डायबेटिस (शूगर), ब्लड प्रेशर (बीपी), टायफॉइड, कावीळ आणि पॅरालिसिस (पक्षाघात) सारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत होता.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
भेसळमाफिया आणि गुटखा तस्करांविरुद्ध धडक मोहीम (Tukaram Mundhe)
यामुळे अनेकांना जीव गमवावा लागला, तर अनेक जण कायमचे अपंग झाले. वारंवार तक्रारी करूनही सरकारचे या माफियांवर कोणतेही नियंत्रण नव्हते. सरकारने तुकाराम मुंढे यांच्यासारख्या कणखर आणि प्रामाणिक अधिकाऱ्याची अन्न व औषध प्रशासन आयुक्तपदी नेमणूक केल्यानंतर चित्र वेगाने बदलले. पदभार स्वीकारताच मुंढे यांनी राज्यातील भेसळमाफिया आणि गुटखा तस्करांविरुद्ध धडक मोहीम उघडून थेट कारवाईचे सत्र सुरू केले. यामुळे राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांची ही धडक कारवाई अशीच सुरू राहिल्यास आगामी काळात राज्यातील अन्न व औषधांमधील भेसळ समूळ नष्ट होईल आणि जनतेला निरोगी आयुष्य जगणे सोपे होईल, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.
मुंढे यांच्या भूमिकेमुळे नवीन पिढी कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांपासून वाचणार
गुटखा, मावा, तंबाखू, हॉटेलमधील निकृष्ट अन्न आणि दुधातील भेसळीवर मुंढे यांनी घेतलेल्या कठोर भूमिकेमुळे नवीन पिढी कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांपासून वाचणार आहे. अशा प्रामाणिक अधिकाऱ्याची बदली राजकीय दबावापोटी करू नये, अशी मागणी संगमनेरकरांनी केली आहे. जर सरकारने त्यांची बदली करण्याचा प्रयत्न केला, तर संगमनेरची जनता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी सरकार व प्रशासनावर राहील, असा कडक इशारा या निवेदनातून देण्यात आला आहे.या निवेदनावर सतीश आहेर, कैलास वाकचौरे, गजेंद्र अभंग, शाम कर्पे, निखिल पापडेजा, शशिकांत घोलप, धनंजय मुर्तडक यांसह अनेक संगमनेरकर नागरिकांच्या सह्या आहेत.


