DC : नगर : कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर येथे आयोजित ‘ग्रामसंवाद’ कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधला. ग्रामस्थांनी मांडलेल्या विविध समस्यांवर सर्व शासकीय विभागांशी समन्वय साधून जास्तीत जास्त प्रश्न मार्गी लावले जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी आमदार आशुतोष काळे उपस्थित होते.
हेही वाचा : खरवंडी कासार बंद; वाढत्या चोऱ्यांविरोधात नागरिकांचा रास्ता रोको
प्रलंबित प्रश्न सोडविणार
उपलब्ध विकासनिधी व तांत्रिक बाबींचा विचार करून गावातील प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यात येतील, असे जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी स्पष्ट केले.या बैठकीत रस्ते, वीज व पाणी या मूलभूत सुविधांवर प्रामुख्याने चर्चा झाली. जिल्हाधिकारी म्हणाले, गावांतर्गत रस्ते तसेच कोपरगाव-संगमनेर रस्त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत कार्यवाही केली जाईल. महावितरणच्या रोहित्रांबाबत वारंवार उद्भवणाऱ्या समस्या तसेच पाणीवाटपाशी संबंधित प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महसूल प्रशासन सकारात्मक असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीनुसार गावात एक हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण केवळ सातशे ते आठशे इतके असल्याची बाब अत्यंत चिंताजनक असून, ग्रामपंचायत व प्रशासनाने यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
नक्की पहा : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? निलेश लंके स्पष्टच म्हणाले
नागरिकांच्या सोयीसाठी शिबिरे (DC)
स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचरा विलगीकरण अधिक प्रभावीपणे राबविण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. गावात राष्ट्रीयीकृत बँकेची शाखा तसेच दर्जेदार मोबाईल नेटवर्क उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत असल्याचे चर्चेतून समोर आले. या समस्येच्या निराकरणासाठी दूरसंचार विभागाकडे अधिकृत प्रस्ताव पाठवून मोबाईल नेटवर्क सुधारण्यासाठी प्रयत्न केले जातील. तसेच नागरिकांच्या सोयीसाठी विशेष शिबिरे आयोजित करून आधार कार्ड अद्ययावतीकरण, शिधापत्रिका व आयुष्मान भारत योजनेशी संबंधित प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.



