Shivdurg Stone inscription : श्रीगोंद्यातील म्हातारपिंपरी येथे मराठाकालीन शिलालेख आढळला; भैरवनाथ मंदिराच्या इतिहासावर प्रकाश

Shivdurg Trekkers : श्रीगोंद्यातील म्हातारपिंपरी येथे मराठाकालीन शिलालेख आढळला; भैरवनाथ मंदिराच्या इतिहासावर प्रकाश

0
Shivdurg Trekkers : श्रीगोंद्यातील म्हातारपिंपरी येथे मराठाकालीन शिलालेख आढळला; भैरवनाथ मंदिराच्या इतिहासावर प्रकाश
Shivdurg Trekkers : श्रीगोंद्यातील म्हातारपिंपरी येथे मराठाकालीन शिलालेख आढळला; भैरवनाथ मंदिराच्या इतिहासावर प्रकाश

Shivdurg Stone inscription : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मौजे म्हातारपिंपरी येथील प्रसिद्ध ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिराच्या मुख्य गाभाऱ्याच्या भिंतीच्या उजव्या बाजूस कोरलेला सुमारे २८३ वर्षांपूर्वीचा मराठाकालीन शिलालेख नुकताच समोर आला आहे. देवनागरी लिपीतील मराठी भाषेत कोरलेल्या या १५ ओळींच्या शिलालेखामुळे मंदिराचा इतिहास, तत्कालीन ग्रामव्यवस्था आणि सामाजिक रचनेवर महत्त्वपूर्ण प्रकाश पडला आहे.

असा आहे शिलालेख

सदर शिलालेख शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश इंगळे यांच्या संशोधनातून आणि शिलालेख अभ्यासक अनिल दुधाने यांच्या वाचनातून उजेडात आला आहे. गुळगुळीत दगडी शिळेवर कोरलेली त्यावरील अक्षरे आजही स्पष्ट, रेखीव आणि सुवाच्च आहेत. रंगरंगोटीमुळे काही कोपऱ्यांतील अक्षरे किंचित झिजली असली तरी छाप घेतल्यानंतर संपूर्ण लेखन सहज वाचता येते. विशेष म्हणजे शिलालेखाच्या मध्यभागी नांगराचे चिन्ह कोरण्यात आले असून ते त्या काळातील मुकादम किंवा पाटीलकीचे प्रतीक मानले जाते. शिलालेखाचे वाचन केल्यानंतर शके १६६५, रुधिरोद्गारी नाम संवत्सर, श्रावण शुद्ध पंचमी, गुरुवार अर्थात १४ जुलै १७४३ रोजी मंदिरनिर्मितीचा हा उपक्रम पूर्ण झाल्याची नोंद आढळून आली आहे. लेखानुसार येमाजी वलद येसवंतराव वाबळे पाटील मुकादम यांच्या संताजीराव, राणोजी, चापाजी, जानोजी आणि येसवंतराव या पुत्रांनी लोककल्याणार्थ हे देवालय उभारले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा :  पुष्करणी बारवेवर आढळला प्राचीन शिलालेख; शिवदुर्गकडून श्रीगोंद्यातील ४५वा शिलालेख उजेडात

शिलालेखात “मौजे म्हातारपिंपरी, परगणा कर्डे, सरकार जुन्नर” असा स्पष्ट उल्लेख आढळत असल्याने तत्कालीन प्रशासकीय रचनेचीही माहिती मिळते. तसेच बिकलम दामाजी, धर्माजी कुळकर्णी आणि नित्यानंद दामोदर जोशी यांनी लेखन व नोंदणीचे कार्य केल्याचे नमूद आहे. त्यामुळे गावपातळीवरील महसुली, लेखनिक आणि धार्मिक अधिकाऱ्यांच्या भूमिकेचाही महत्त्वपूर्ण पुरावा या शिलालेखातून मिळतो.

“हा शिलालेख केवळ मंदिरनिर्मितीची नोंद नसून मराठाकालीन ग्रामीण समाजरचना, ग्रामदेवता उपासना, स्थानिक सत्ताकेंद्रे, वतनदारी व्यवस्था, प्रशासकीय विभाग, लेखनिक परंपरा आणि कौटुंबिक इतिहास यांचा एकत्रित दस्तऐवज म्हणून अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक स्रोत ठरतो.”

अनिल किसन दुधाणे

(शिलालेखाचे वाचक)

नक्की पहा : अहिल्यानगरमध्ये तरुणावर कुऱ्हाडीने वार करत हत्या

यांचे मोलाचे योगदान (Shivdurg Stone inscription)

महाराष्ट्रातील ग्रामदैवत परंपरेत भैरवनाथाला विशेष स्थान आहे. “जयाचे चरणी दृढ भाव” या वाक्यप्रयोगातून ग्रामस्थांची देवतेप्रती असलेली श्रद्धा आणि भक्तिभाव स्पष्टपणे दिसून येतो. तसेच एका कुटुंबातील अनेक सदस्यांची नावे नमूद असल्याने स्थानिक वंशावळ आणि घराण्यांच्या इतिहासाच्या अभ्यासासाठीही हा शिलालेख उपयुक्त ठरणार आहे. या शिलालेखाचा शोध, छायाचित्रण आणि छाप घेण्याचे कार्य शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संचालित शिवदुर्ग वारसा संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आले. यासाठी संशोधक राजेश इंगळे, मारुती वागस्कर, विक्रम वाबळे, नितीन वाबळे, दिगंबर भुजबळ, सचिन भोसले, सोमनाथ गोसावी तसेच म्हातारपिंपरी ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले.